29.2 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रमाहिममध्ये सरवणकर लढतीवर ठाम

माहिममध्ये सरवणकर लढतीवर ठाम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माहिम विधानसभेच्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. कारण या विधानसभेतून सदा सरवणकर हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरवणकर यांची भेट घेण्यास नाकारल्यानंतर त्यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्यामुळे आता माहिम विधानसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. माहिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून दोन वेळचे आमदार सदा सरवणकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी घोषित केली. तर मनसेकडूनही अमित ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले.

पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाला जिंकवून देणे हा महायुतीचा धर्म असल्याचे म्हणत भाजपा नेत्यांनी सरवणकरांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले. पण सरवणकर मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सोमवारी (ता. ४ नोव्हेंबर) सदा सरवणकर यांच्याशी मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. त्यानंतर त्यांनी त्यांची भेट सुद्धा घेतली, जिथे राज ठाकरे यांची भेट घेऊन मग नंतर निर्णय घेऊ असे सरवणकरांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर सदा सरवणकर हे दादरमध्ये राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले. त्यावेळी सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि अन्य चार पदाधिकारी सुरुवातीला ठाकरेंच्या भेटीसाठी गेले. पण यावेळी राज ठाकरेंनी भेट घेणे टाळले. त्यांचा हा निरोप घेऊन समाधान सरवणकर वडिलांना भेटले. त्यानंतर प्रसार माध्यमांसमोर माहिम विधानसभेचे उमेदवार सदा सरवणकर म्हणाले की, राज ठाकरेंना भेटायला माझा मुलगा आणि चार पदाधिकारी गेले होते.

यावेळी समाधान यांनी सांगितले की, पप्पा (सदा सरवणकर) बाजूला आहेत, तुम्हाला भेटू इच्छितात, निवडणुकीबाबत बोलू इच्छितात. पण राज ठाकरे म्हणाले, मला काही बोलायचे नाही. तुम्हाला निवडणूक लढवायची तर लढवा, उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा तर मागे घ्या. मला यावर कोणतीही चर्चा करायची नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

त्यामुळे राज ठाकरे आणि माझ्यात कोणतेही बोलणे झाले नाही. राज ठाकरे यांनी भेटसुद्धा नाकारली. त्यामुळे आता एक कार्यकर्ता म्हणून मला माहिममधून निवडणूक लढवावी लागेल. भेटच मिळणार नसेल तर मला माझा निर्णय घ्यावा लागेल. मी महायुतीचा उमेदवार म्हणून रिंगणात आहे. वैयक्तिक मैत्रीपोटी भाजपाचे काही नेते अमित ठाकरे यांना पाठिंबा देत असतील. पण महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला. तर, आम्ही मदतीसाठी एक नव्हे तर दोन्ही हात पुढे केले होते. राज ठाकरे यांनी दिलेला आदेश आम्ही ऐकणार होतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागायचे ठरवले होते. पण त्यांनी भेटच नाकारली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला राज ठाकरे यांची भेट घ्यायला सांगितली होती, ज्यामुळे मी आलो असेही यावेळी सरवणकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR