30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रमालोजीराजेंनी मधुरिमाराजे यांना माघारीसाठी खेचून बाहेर आणले

मालोजीराजेंनी मधुरिमाराजे यांना माघारीसाठी खेचून बाहेर आणले

कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात जोरदार राजकीय राडा झाल्याचे दिसून आले. कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंनी शेवटच्या क्षणी अर्ज माघारी घेतला. महाविकास आघाडी आणि सतेज पाटलांसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. मधुरिमाराजेंच्या अर्ज माघारीसाठी प्रत्यक्ष शाहू महाराजांचाच दबाव असल्याचे समोर आले. शाहू महाराजांच्या आदेशानंतर मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंचा हात पकडत खेचून बाहेर आणले आणि उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला भाग पाडले. त्या ठिकाणचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी आधी माजी नगरसेवक राजू लाटकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र काँग्रेसने एका दिवसात उमेदवारी बदलली आणि मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. मात्र एकाच घरात दोन दोन पदं नको अशी भूमिका शाहू महाराजांची होती अशी माहिती आहे. त्यामुळेच शाहू महाराजांच्या आदेशानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा आहे.

यादरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सतेज पाटलांचा पारा मात्र चांगलाच चढल्याचे दिसून आले. त्यांनी शाहू महाराजांसमोर नाराजी व्यक्त केली. लढायचं नव्हतं तर आधीच सांगायचं होतं, मला कशाला तोंडघशी पाडलं असं त्यांनी विचारलं. माझी फसवणूक केली, हे काही बरोबर झालं नाही असंही ते म्हणाले.

ज्या लोकांनी आग लावण्याचं काम केलं त्यांना सोडणार नाही असा दमही सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या अवती-भोवती असणा-या लोकांना दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर आल्यानंतरही ते भडकले. जर तुमच्यात दम नव्हता तर कशाला उभं राहिलात, मी पण माझी ताकद दाखवली असती असं सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या जवळच्या लोकांना उद्देशून म्हटलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR