निवडणुकांचा प्रचार सुरू झाला की, नेत्यांना कंठ फुटतो आणि त्यांचे बरळणे सुरू होते. एखाद्याला का निवडून द्यायचे, त्यांनी कोणती चांगली कामे केली आहेत ते सांगणे राहिले बाजूलाच पण एकमेकांबद्दल आरोप-प्रत्यारोप करणे, उणी-दुणी काढणे सुरू होते, नव्हे त्याला अक्षरश: पेव फुटते. नेत्यांनी प्रचार भाषणात जाहीर वक्तव्ये करताना संयम बाळगणे आवश्यक आहे. हयात नसलेल्या, कधीकाळी साथीदार सहकारी असलेल्या व्यक्तींबद्दल किंवा ज्यांचे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत, अशा महनीय व्यक्तींबद्दल आताच उपरती आल्यासारखी विधाने करून नको ते वाद निर्माण केले जाऊ नयेत, परंतु आज तसे होताना दिसत नाही. मतदारावर आघात होतील आणि तो संभ्रमित होईल, अशी परिस्थिती निर्माण करून त्यालाच राजकारणाचा एक डाव मानणे ही आजच्या नेत्यांची खेळी. राज्याराज्यात, माणसा-माणसात अशांतता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केली होती. त्यांनी माझा केसाने गळा कापला, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. या आरोपामध्ये आर. आर. पाटलांना सही करण्यास शरद पवार यांनीच सांगितले असा छुपा आरोपही आहे. आर. आर. आबांना जाऊन ९ वर्षे झाली.
नऊ वर्षांनंतर अजित पवारांना आपल्या मनातील मळमळ का ओकावीशी वाटली? गेलेल्या व्यक्तीबद्दल काही बोलायचे नसते हे अजित पवारांना माहीत नाही काय? दुसरे म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना आपल्या निवासस्थानी बोलावून त्यासंबंधीची गोपनीय फाईल दाखवली होती म्हणे. गोपनीय फाईल दाखवण्याचा फडणवीसांना काय अधिकार होता? राजकीय महत्त्वाकांक्षेपोटीच अजित पवारांचे बरळणे सुरू आहे. अजित पवार घड्याळ चोरणारे पाकीटमार आहेत, अशी टीका शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. अजित पवारांनी घड्याळ चोरले पण त्यांना पोलिस पकडत नाहीत. पोलिस म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त, ते त्यांच्याबरोबर आहेत, असेही आव्हाड म्हणाले. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत अडचणीत आले. शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबद्दल बोलताना ‘इम्पोर्टेड माल’ अशी टिप्पणी केली होती. जी व्यक्ती एका महिलेचा सन्मान करू शकत नाही, ‘माल’या शब्दाचा वापर करते, तिच्याबद्दल शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले यांनी बोलणे गरजेचे आहे असे शायना म्हणाल्या. या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी निवडणूक आयोगाला कारवाईची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. शायना एनसी यांच्याबाबत बोलताना उबाठा खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवीत ‘आयात माल’ चालणार नाही असे विधान केले आहे. मराठीत ‘माल’ या शब्दाचा वापर महिलांचा अपमान करण्यासाठी केला जातो. अरविंद सावंत यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचे मत राष्ट्रीय महिला आयोगाने व्यक्त केले आहे.
शायना एनसी या मुंबईचे माजी शेरीफ नाना चुडासामा यांच्या कन्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार अमिन पटेल यांच्या प्रचारादरम्यान अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्यावर टीका करताना ‘इथे इम्पोर्टेड चालत नाही, ओरिजनल माल चालतो’ असे वक्तव्य केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त करताना म्हटले की, कोणाच्याही भावना दुखवाव्यात, कोणत्याही भगिनीचा अवमान व्हावा, असे माझ्या आयुष्यात मी कधी काही केले नाही. मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. प्रेमात आणि युद्धात सारे काही माफ असते असे म्हणतात. त्यात आता राजकारणातील युद्धाचाही समावेश करावा लागेल. राजकारणात कोण किती खालच्या पातळीवर जायचे, हे ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेवर अवलंबून राहील. सध्या राजकारण इतक्या खालच्या थराला गेले आहे की, सर्वसामान्यांना सुद्धा त्याची घृणा वाटू लागली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण आधीच तापलेले असताना संगमनेर तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात जी अश्लाघ्य विधाने केली ती अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशमुख यांना असे वक्तव्य करण्यापासून कोणीही रोखले नाही. उलट व्यासपीठावरील नेते, पदाधिकारी आणि समोर बसलेले कार्यकर्ते टाळ्या पिटत होते. डॉ. जयश्री थोरात गत काही काळापासून राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. पुरुषी अहंकारातून राजकारणात उतरू इच्छित असलेल्या महिलेबद्दल अनुचित उद्गार काढणे म्हणजे कोत्या आणि हिडीस राजकारणाचा भाग म्हटला पाहिजे. लाडकी बहीण योजना सुरू करणा-या महायुती सरकारची यामुळे चांगलीच अडचण झाली आहे.
राजकीय कार्यकर्ते महिलांबाबतची अशी मानसिकता बाळगून आपल्या पक्षाची टिमकी वाजवणार असतील तर ही परिस्थिती अतिशय कठीण म्हणावी लागेल. विशेष म्हणजे अशा कार्यकर्त्यांना राजकीय पक्ष पाठीशी घालतात हे सर्वांत धोकादायक आहे. भाजप एकीकडे महिला सबलीकरणाचा नारा देत आहे आणि दुसरीकडे महिलांचा अपमान करत आहे. एकीकडे राजकीय पक्ष न्यायाची चर्चा करतात आणि दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना राजकीय आखाड्यात उतरवतात. हे राजकीय पक्षांचे ढोंग म्हणावे लागेल. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही आणि महिला सुरक्षेवरून गंभीर चर्चा सुरू असताना असे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत. सत्तेत राहणा-या अशा लोकप्रतिधींकडून न्यायाची अपेक्षा कशी करता येईल? गत काही वर्षांपासून अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. असे आरोप असलेल्यांना खड्यासारखे वेचून बाजूला काढत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास सर्वच पक्षांनी प्राधान्य दिले पाहिजे.