25.8 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणूक रिंगणात!

राज्यातील २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणूक रिंगणात!

सर्वाधिक ३४ उमेदवार माजलगाव मतदारसंघात, तर शहादा मतदारसंघात केवळ ३ उमेदवार

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २८८ मतदारसंघात २९३८ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अंतिमत: ४ हजार १४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. २० तारखेला त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. पंधराव्या विधानसभेसाठी आठ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ७ हजार ७८ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी ३ वाजता संपली. त्यातील २९३८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे अंतिमत: ४ हजार १४० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. सर्वाधिक ३४ उमेदवार बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघात केवळ ३ उमेदवार आहेत.

नांदेड उत्तर मतदारसंघात ३३, बीड मतदारसंघात ३१ उमेदवार रिंगणात आहेत. महाड व कुडाळ मतदारसंघात ५ तर बोईसर व धुळे जिल्ह्यातील शिरपूर मतदारसंघात ६ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार २० नोव्हेंबर रोजी त्यांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत.

सर्वांधिक मतदार पुणे जिल्ह्यात!
विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. पुण्यातील एकूण मतदारसंख्या ८८ लाख ४९ हजार ५९० आहे तर मुंबई उपनगरात ७६ लाख ८६ हजार ९८ मतदार आहेत. ठाण्यात ७२ लाख २९ हजार ३३९, नाशिक जिल्ह्यात ५० लाख ६१ हजार १८५ आणि नागपुरात ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार आहेत.

पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक !

रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. रत्नागिरीतील एकूण मतदार संख्या १३ लाख ३९ हजार ६९७ असून यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ४६ हजार १७६ आणि महिला मतदार ६ लाख ९३ हजार ५१० आहेत. नंदुरबारमध्ये एकूण मतदार १३ लाख २१ हजार ६४२ असून यामध्ये १३ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ५४ हजार ४१२ आणि महिला मतदार ६ लाख ६७ हजार २१७ आहेत.

गोंदिया जिल्ह्यात एकूण मतदार ११ लाख २५ हजार १०० असून यामध्ये १० तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ५ लाख ५३ हजार ६८५ आणि महिला मतदार ५ लाख ७१ हजार ४०५ आहेत. भंडारा येथे एकूण मतदार १० लाख १६ हजार ८७० असून यामध्ये ४ तृतीयपंथींची नोंद आहे; पुरुष मतदार ५ लाख ६ हजार ९७४ आणि महिला मतदार ५ लाख ९ हजार ८९२ आहेत. सिंधुदुर्गात एकूण मतदार ६ लाख ७८ हजार ९२८ असून यामध्ये ३ तृतीयपंथींची नोंद आहे. पुरुष मतदार ३ लाख ३६ हजार ९९१ आणि महिला मतदार ३ लाख ४१ हजार ९३४ आहेत.

राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार
राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंद आहे ज्यामध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला आणि ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत.

५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार
अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. सोलापूरमध्ये ३८ लाख ४८ हजार ८६९, अहमदनगरमध्ये ३७ लाख ८३ हजार ९८७, जळगावमध्ये ३६ लाख ७८ हजार ११२, कोल्हापूरमध्ये ३३ लाख ५ हजार ९८ आणि औरंगाबादमध्ये ३२ लाख २ हजार ७५१ मतदार आहेत. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या १० जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR