कोल्हापूर : प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराजांशी मी चर्चा केली, त्यांनाही विश्वासात घेऊन एकत्र निर्णय घेऊ. काल जे स्टेटमेंट होतं, त्यानंतर मी वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. जे घडलं त्यावर पुन्हा बोलून मी वाद वाढवणार नाही. छत्रपती शाहू महाराजांविषयी माझ्या मनात आदरच आहे. गादीचा सन्मान करणे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका कायम राहील, असे सतेज पाटलांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांचा चांगलाच भडका उडाला. त्यानंतर रात्री कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर झाले. मात्र दुस-याच दिवशी सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवल्याचे दिसले. कालच्या विषयावर मी पडदा टाकायचा निर्णय घेतला आहे, असे म्हणत हसत हसतच बंटी पाटलांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली.
अजिंक्यतारा येथे इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या बैठकीनंतर सतेज पाटील बोलत होते.
काल ४ नोव्हेंबरला जे घडले त्यावर बोलायची आता मला आवश्यकता वाटत नाही. पुढे कसे जावे, यावर महाविकास आघाडी म्हणून मी सर्वांशी चर्चा करणार आहे.
कोल्हापूर उत्तरची जागा ठाकरे गटाने वारंवार मागितली होती, असे संजय राऊत म्हणाले, यावर प्रश्न विचारला असता सतेज पाटील म्हणाले की, मला आणखी कोणतीही काँट्रोव्हर्सी करायची नाही, झालं तेवढं पुरे आहे. आता पुढे जाणे महत्त्वाचे आहे. ज्या गोष्टी घडल्या, त्या सर्वांच्या समोर आहेत. त्यावर मी काही बोलणं संयुक्तिक नाही. पुढची दिशा सगळ्यांना विश्वासात घेऊन स्पष्ट करू, असेही ते म्हणाले.