मुंबई : रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलिस महासंचालक पदावरून हटविल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी नवे पोलिस महासंचालक म्हणून १९९० च्या तुकडीचे अधिकारी संजय कुमार वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील पत्र आजच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिले. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत वर्मा यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे.
विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केले होते. शुक्ला या भाजपसाठी काम करत असून विधानसभा निवडणूक निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. याशिवाय शुक्ला यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांना देण्यात आलेली मुदतवाढ नियमबा असल्याचा आरोपही पटोले यांनी केला होता. नाना पटोले यांनी गेल्या दोन महिन्यात निवडणूक आयोगाला चारवेळा पत्र दिल्यानंतर आयोगाने अखेर सोमवारी रश्मी शुक्ला यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेताना आयोगाने सेवा ज्येष्ठतेनुसार तीन पोलिस अधिका-यांची नावे पाठविण्याची सूचना मुख्य सचिवांना केली होती. पाठवलेल्या तीन नावांमधून आयोगाने महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक म्हणून संजय कुमार वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
संजय वर्मा हे मुळचे उत्तर प्रदेशचे असून ते १९९० च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे तीन दशकाहून अधिक काळ पोलीस सेवेत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते कायदा आणि तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. वर्मा हे न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्या कौशल्यांसाठी ओळखले जातात. कायदा आणि तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी न्यायवैद्यक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.