लातूर : प्रतिनिधी
सर्वधर्मसमभावाचा विचार, जात विरहित समाज हा महात्मा बसवेश्वरांनी दिलेला मंत्र आहे. काँग्रेसनेसुद्धा सर्वधर्मसमभाव हाच विचार सुरुवातीपासून जोपासला. गेल्या पन्नास वर्षांमध्ये काँग्रेसने या जिल्ह्यात-शहरात याच विचारांवर राजकारण केले. आदरणीय केशवराव सोनवणे यांच्यापासून शिवराज पाटील चाकूरकर, लोकनेते विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख, डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे आणि आम्ही सर्वांनी सामान्य माणसाच्या केसाला धक्का लागू न देता त्यांना जपण्याचे काम केले, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे व समस्त लिंगायत समाज लातूर आयोजित ऋणनिर्देश व दीपावली स्नेह मीलन सोहळ्यात माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सरकार महर्षी दिलीपराव देशमुख होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, माजी महापौर स्मिता खानापूरे, बंडाप्पा काळगे, डॉ. अरविंद भातांब्रे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकला नाही. पण अलीकडे रोज दिल्ली पुढे मुजरा करतो आहे. या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष उभे राहिले आहेत. पण आपल्याला महाविकास आघाडीला निवडून आणायचे आहे, काँग्रेस पक्षाला निवडून आणायचे आहे. तुमचे आशीर्वाद येत्या २० नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे करावेत. लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा या लातूर जिल्ह्यातील सहाच्या सहा जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणावे, असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केले.
यावेळी लक्ष्मीकांत मंठाळे, रामलिंग ठेसे, बसवंतआप्पा बरडे यांनी मनोगत व्यक्त्त करुन लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवकांत स्वामी व राम स्वामी यांनी केली तर शेवटी आभार नागेश स्वामी यांनी मानले. यावेळी लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.