मुंबई : माहीम मतदारसंघात भाजपा अमित ठाकरेंचा प्रचार करणार का, समर्थन देणार का याबाबत भाजपच्याच नेत्यांमध्ये संभ्रम असताना आशिष शेलार यांनी शिवडीतमनसेचे नेते उमेदवार बाळा नांदगावकर यांना समर्थन जाहीर केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच अपक्ष उमेदवार जरी भाजपाचे समर्थन असल्याचे सांगत असला तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी म्हटले आहे.
मनसेला दिलेले समर्थन हे फक्त शिवडीपुरतेच असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले. शिवडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. ज्या अपक्षाने भाजपाचा उल्लेख केला त्याला आमचे समर्थन नाही. कारण कुठलाही संवाद, चर्चा न करता, थेट अर्ज भरण्यात आला. यामुळे दोघेच रिंगणात राहतात. मविआचे अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर. लोकांची कामे होण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. भाजपा विचारधारेवर चालणारा आहे, यामुळे ही विचारधारा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे, असे शेलार म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा दगाबाज म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले जाईल. शिवडी हा वारक-यांचा विभाग आहे. उद्धव ठाकरे आषाढीला पंढरपूरला गेले खरे परंतू त्यांनी पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करणार नाही ही भूमिका घेतली होती. कोरोनाकाळात जेव्हा लोक देवाचा धावा करीत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मंदिरे बंद केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यावेळी वारी रोखली, अशी टीका शेलार यांनी केली.