गडचिरोली : विशेष प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या अहेरी मतदारसंघावर आत्राम राजघराण्याचा अनेक वर्षांपासून पगडा आहे. या मतदारसंघात भाऊ-भाऊ, काका-पुतणे अशा लढती आतापर्यंत सर्वांनी पाहिल्या, पण यावेळी पहिल्यांदाच या राजघराण्यातील तिघेजण मैदानात आमने-सामने उतरले आहेत.
अहेरीत यावेळी राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धर्मराव बाबा आत्राम, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाग्यश्री आत्राम असा सामना आहे. त्यात महायुतीचा धर्म नाकारून अंबरीष आत्राम यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे पिता कन्येसह पुतणे अशी नात्यागोत्याची तिहेरी लढत पाहावयास मिळत आहे.
महायुतीतील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार व अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरुद्ध कन्या भाग्यश्री आत्राम (हलेगकर) यांना महाविकास आघाडीने (राष्ट्रवादी शरद पवार गट) मैदानात उतरविले. उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीतून या धर्मरावबाबा यांचे पुतणे व माजी राज्यमंत्री अंबरीष आत्राम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.
त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे आत्राम राजघराण्यातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. विदर्भासह राज्यभरात ही लढत चर्चेची ठरत आहे.