23.3 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीनंतर मुंबईचे पाणी महागणार!

विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईचे पाणी महागणार!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे गेल्या दोन वर्षांपासून पाणीपट्टी वाढ सरकारने रोखून धरली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईचे पाणी महागणार आहे. सुमारे ८ टक्केपर्यंत ही पाणीपट्टी वाढण्याची शक्यता असून याची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाणीपट्टीत वाढ झाल्यानंतर घरगुती व व्यावसायिक पाणीपट्टीत किमान प्रति एक हजार लिटर मागे ५५ पैसे ते ६ रुपये पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय नियमानुसार ७० टक्के मलनि:सारण शुल्क स्वतंत्र द्यावा लागणार आहे.

जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, प्रचालन व परिरक्षण खर्च, विद्युत खर्च व शासनाच्या भातसा व अप्पर वैतरणा धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी यांच्या एकत्रिक खर्चाचा आढावा घेतला असता खर्च वाढलेला दिसून आला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून मुंबई महापालिका पाणीपट्टी वाढ करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागत आहे. परंतु निवडणुका लक्षात घेऊन, राज्य सरकारने पाणीपट्टी वाढीस महापालिकेला परवानगी दिली नाही. त्यामुळे पालिकेला किमान ३०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

प्रतिवर्षी ८ टक्केपर्यंत पाणीपट्टीत वाढ करण्याचा अधिकार स्थायी समितीने पालिका प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे दरवर्षी १६ जूनपासून पाणीपट्टीत वाढ करण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षापासून राजकीय हस्तक्षेपामुळे रखडलेली पाणीपट्टी वाढ विधानसभा निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR