न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहास घडवला आहे. या निवडणुकीत त्यांनी बहुमताचा आकडा पार केला असून ते पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. ते अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष असतील.
एका वृत्तानुसार, निवडणुकीत आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत २७७ मते मिळाली आहेत. बहुमतासाठी २७० मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प या निवडणुकीत विजयी झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना आतापर्यंत २२६ मते मिळाली आहेत.
निवडणुकीचा प्रचार सुरू असताना दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसत होते. मात्र, मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी आघाडी घेतली. अनेक राज्यांमध्ये ट्रम्प यांचा एकहाती विजय झाला. तर हॅरिस यांना कॅलिफोर्नियामध्ये चांगली मते मिळाली.
अमेरिकेतील सात महत्त्वाच्या राज्यांमध्येही ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. ही राज्यांतून मिळालेली आघाडी राष्ट्राध्यक्ष कोण होणार, हे ठरवते. त्यामध्ये पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, अरिझोना, मिशीगन, नेवाडा, कॅरोलिना आणि विस्कोन्सिन या राज्यांचा समावेश आहे. बहुतेक ठिकाणी ट्रम्प यांना आघाडी मिळाली आहे. दरम्यान, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा जोमाने प्रचार करणारे इलॉन मस्क यांनीही ट्रम्प यांचा ‘क्लिस्टल क्लिअर’ विजय झाल्याचे म्हटले आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारासाठी कोट्यवधी रुपये दिले होते.
१३३ वर्षांनी घडला इतिहास
अमेरिकेमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांनी निवडणुकीत पराभवानंतर पुन्हा झालेल्या निवडणुकीत विजय मिळवण्याची घटना १३३ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी दुस-यांदा राष्ट्राध्यक्ष होताना इतिहास घडवला आहे.