बीड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात भाजपामधील जिल्हाप्रमुखांच्या मागोमाग अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राजकीय भूमिका बदलली. यात प्रामुख्याने मराठा आरक्षणाचे कारण पुढे करण्यात आले. मात्र भाजपामधील एका मराठा कार्यकर्त्याने थेट बॉण्डवर भाजपाबरोबरच राहणार असल्याचे लिहून दिल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा परिणाम थेट भाजपात पाहायला मिळाला. त्यामुळे भाजपामधील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. विधानसभेच्या तोंडावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र आयटी सेलचे प्रदेश शहर संयोजक संभाजी सुर्वे यांनी मात्र कोणी कुठे पण जा.. मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार… असा मजकूर थेट बॉण्डवर लिहून पक्षश्रेष्ठींना पाठवला आहे.
संभाजी सुर्वे हे भाजपामधील मराठा कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणुकीत जी परिस्थिती होती ती विधानसभेत देखील पाहायला मिळेल अशी शक्यता होती. त्यामुळे अनेकांनी पक्ष सोडला, मात्र मी एक मराठा म्हणून सदैव पक्षासोबत राहील अशी भूमिका सुर्वे यांनी घेतली.