नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जळगावच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रोहिणी खडसे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुलीच्या प्रचाराला सुरुवात केली होती. दुसरीकडे भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री असलेल्या रोहिणी खडसे यांच्या भावजयी रक्षा खडसे यांनी मात्र रोहिणी खडसेंचा प्रचार करणार नाही, असे म्हणत नणंदेविरोधात कंबर कसली आहे, नाशिकमध्ये त्या माध्यमांशी बोलत होत्या.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा प्रचार करणार नाही, असे म्हणत भाजप नेत्या रक्षा खडसे यांनी नणंदेविरोधात थेट भूमिका घेतली आहे. मुक्ताईनगरमध्ये आमचे महायुतीचे उमेदवार आहेत, आमच्या पक्षाच्या उमेदवारांचे मी काम करेल, पण रोहिणी खडसेंचा प्रचार करणार नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच नाथा भाऊंनी कोणताही लपून- छपून प्रचार केला नाही, त्यांची भूमिका उघड आहे, नाथाभाऊ आधी भाजपमध्ये होते, नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, लोकसभेला त्यांनी मला पाठिंबा दिला. ते वरिष्ठ नेते, त्यांनी विधानसभेला कोणती भूमिका घ्यायची, तो त्यांचा निर्णय आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडीने लोकसभेला फेक नरेटिव्ह सेट केले. पण आम्ही संविधान बदलणार असे कधीही समोर आले नाही. लोकसभेला फटका बसला मात्र सध्या उत्तर महाराष्ट्रात भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे, महिलांचा चांगला प्रतिसाद आहे, लाडकी बहीण योजनेलाही मोठा पाठिंबा मिळत आहे, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने काम केले आहे, त्यामुळे विजय निश्चित आहे. लोकसभेला कांद्याचा फटका बसला. मात्र केंद्राने पॉलिसी करायचा निर्णय घेतला होता, अशावेळी आंतरराष्ट्रीय बाजार आणि ग्राहक यांचाही विचार करावा लागतो, असे म्हणत शेतकरी कोणताही असो काम करणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.