लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने बागायतीचे क्षेत्र ब-याच प्रमाणात वाढणार असली तरी यावर्षी रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होणार आहे. त्यामुळे यावर्षी ३ लाख ८२ हजार ५३७ हेक्टवर पेरणी होईल असा कृषि विभागाचा अंदाज आहे. रबी हंगामासाठी जिल्हयात सध्या जेमतेम डीएपी खताची उपलब्धता आहे. असे असले तरी लवकरच जिल्हयाला रब्बी हंगामातील पिकांसाठी लागणारा रासायनीक खतांचा संरक्षीत साठा मिळणार आहे.
जिल्हयात यावर्षी ३ लाख ८२ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा होण्याची शक्यता आहे. यात ज्वारीचा ७१ हजार ४ हेक्टरवर, मका २ हजार ६३ हेक्टर, गहू १० हजार ५३२ हेक्टर, हरभरा २ लाख ७६ हजार ९५२ हेक्टर, करडई २१ हजार ७२० हेक्टर, सुर्यफूल ८६ हेक्टर, जवस १८० हेक्टर, तीळ २ हेक्टर, भुईमूग, लहान कारळे आदी पिकांचा पेरा होणार आहे.
रब्बी हंगामासाठी लातूर जिल्हयात सरासरी ४७ हजार २२ मेट्रीक टन रासायनीक खताचा वापर होतो. त्यानुसार कृषि विभागाने ९७ हजार ६०२ मेट्रीक टन खताचा मागणी केली होती. त्यानुसार ऑक्टोबर अखेर ९ हजार २०६ मेट्रीक टन खताला मंजूरी मिळाली असून ऑक्टोबर पासून आत्तापर्यंत जिल्हयास ६ हजार ७२८ मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे जिल्हयात आज घडीला ५४ हजार ३६३ मेट्रीक टन खता पैकी ११ हजार ३७४ मेट्रीक टन खताची विक्री झाली आहे. तर ४२ हजार ९८९ मेट्रीक टन खत ऑक्टोबर अखेर शिल्लक होता. सध्या रब्बी पिकांच्या पेरण्या सुरू असून जिल्हयात जेमतेम रासायनीक खताचा साठा शिल्लक आहे.
जिल्हयात रब्बीच्या पिकांच्या बरोबरच यावर्षी पाऊस मोठया प्रमाणात झाल्याने शेतकरी ऊस लागवडीकडे वळाले आहेत. या ऊसाच्या पिकाला वाढीसाठी टप्या-टप्याने रासायनीक खताची गरज आहे. त्यासाठीही शेतकरी युरीया व डिएपी खताची खरेदी करताना दिसून येत आहेत.