प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पुढील वर्षी महाकुंभ मेळा होत आहे. याच्या नियोजनासाठी आखाड्यांनी बैठक बोलविली होती. या बैठकीत वाद झाल्याने साधु-संतांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे सरचिटणीस स्वामी हरी गिरी यांनी संघर्ष शांत केला.
मेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात ही बैठक बोलविण्यात आली होती. गिरी हे अध्यक्ष होते. यावेळी आखाड्यांमधील मतभेद समोर आले. महाकुंभ मेळ्यासाठी जमीन वाटपावर चर्चा करण्यासाठी सर्व आखाडे एकत्र आले होते.
हाणामारीमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतू यात काहीजण जखमी झाले आहेत. बैठकीत काही साधूंना जागा मिळाली नाही. यावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. वाद मिटविल्यानंतर एक गट जागा पाहण्यासाठी निघून गेला तर दुसरा गट तिथेच बसून राहिला. हे प्रकरण आणखी वाढू नये म्हणून गिरी यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. महाकुंभमेळ्याला हजेरी लावायची की बहिष्कार टाकायचा, अशी चर्चा गटांमध्ये सुरु झाल्याचे सुत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.