पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण कसे करायचे हे शिकवले आहे. पवार साहेबांबद्दल पुन्हा असे घडता कामा नये शिवाय कोणत्याच नेत्याबद्दल असे बोलू नये. विरोधकांबद्दल बोलताना मर्यादा पाळायची असते, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण थेट सदाभाऊ खोत यांना फोन करून वक्तव्याचा निषेध केल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. अनेक नेत्यांनी खोत यांच्यावर टीका केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले,आरोप-प्रत्यारोप होतात, पण ते मांडण्याची एक पद्धत असते. हीच पद्धत पुढे वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पवारसाहेब, विलासराव देशमुख यांनी चालू ठेवली. पण कालचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मी काल तीव्र शब्दांत त्याचा निषेध केला आहे. शिवाय मी एवढ्यावरच थांबलो नाही, तर मी त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटले, तुम्ही जे स्टेटमेंट केले, ते आम्हाला कोणाला आवडलेले नाही. कोणाविषयी व्यक्तिगत बोलणे ही आपली पद्धत नाही. असे आपण खोत यांना सांगितल्याचे अजितदादांनी सांगितले.
विनाशकाले विपरीत बुद्धी
तसेच अजित पवार यांनी खोत यांचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचे म्हटले. ते म्हणाले, पवार साहेबांबद्दल पुन्हा असे घडता कामा नये शिवाय कोणत्याच नेत्याबद्दल असे बोलू नये. तुमची विचारधारा वेगळी असू शकते. मतमतांतरे असू शकतात. पण हे मांडताना ताळमेळ असला पाहिजे. हा विनाशकाले विपरीत बुद्धी असा प्रकार आहे.
फडणवीसांनी खोतांच्या कानफडात मारले पाहिजे
: संजय राऊत
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, टीका करायला लोकशाहीत काही हरकत नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच करतो. हे राज्य सुसंस्कृत, संयमी आहे. हे संतांचे राज्य आहे. फडणवीसांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती. पण ते फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते.