20.5 C
Latur
Thursday, November 7, 2024
Homeसोलापूरस्मार्ट सोलापुरात वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा

स्मार्ट सोलापुरात वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा

सोलापूर : स्मार्ट सोलापुरात वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. शहराच्या मुख्य बाजारपेठेत एकेरी वाहतूक असताना देखील चार चाकी वाहने सर्रासपणे, चालवली जातात व रस्त्याच्या कडेला लावली जातात. यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

स्मार्ट सोलापूर म्हणून ख्याती पावलेले सोलापूर शहरात वाहनधारकांची मनमानी शहरात सुरू आहे, असे चित्र दिसत आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठा वाहनांच्या बजबजपुरीने व्यापून गेले आहेत. चाटी गल्ली, सराफ बाजार, मधला मारुती, टिळक चौक या बाजारपेठांच्या रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो. परगावहन आलेली वाहने एकेरी वाहतुकीमध्ये अडकून पडतात, अशावेळी कित्येक वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहन चालकांना रस्त्यावरच उभे राहावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शहराच्या सराफ बाजारामध्ये चारचाकी वाहन उलट दिशेने आल्याने तासभर वाहतूक जाम झाली होती. रस्त्याच्या उलट दिशेने येणा-या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. परगावाहून आलेल्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, संबंधित वाहनधारकांना एकेरी मार्गाबाबत माहिती नसल्याने सुसाटपणे वाहने चालविली जातात. अशावेळी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते. याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. विविध प्रकारच्या खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने बाजारपेठेत आलेल्या वाहनधारकांना देखील तारेवरची कसरत करत ये-जा करावी लागत आहे.

अशावेळी प्रशासनाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक व्यापा-यांकडून केली जात आहे. तुळजापूरवेसकडून मधला मारुती चौककडे जाणारा मार्ग हा एकेरी मार्ग आहे. याच मार्गावर वाहने खुशालपणे चालवले जातात. किंबहुना रस्त्यावर वाहने उभे केले जातात. खरेदीसाठी ग्राहकांची या ठिकाणी वर्दळ असते. मात्र इतर वाहनधारकांना आणि पादचा-यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठ असल्याने येथे वाहनांचा मोठ्या प्रमाणात वावर होत आहे. एकेरी वाहतुकीमध्ये वाहन चालवल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR