15.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडणार

राज्यात प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडणार

पंतप्रधान मोदींच्या आठवडाभरात ९ सभा, राहुल गांधी, प्रियंका गांधींसह कॉंग्रेसची फौजही राज्यात येणार

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या रणधुमाळीला जोर चढत असून राष्ट्रीय नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे बडे नेते राज्यात यायला सुरुवात झाली असून, मोदींच्या शुक्रवारी धुळे आणि नाशिकमध्ये २ प्रचारसभा होणार आहेत, तर आठवडाभरात त्यांच्या एकूण ९ सभा होणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही राज्यात तळ ठोकून आहेत. योगी आदित्यनाथ यांच्याही सभा सुरू आहेत.

दुसरीकडे कॉंग्रेस नेत्यांची फौजही लवकरच राज्यात येणार असून, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह प्रमुख नेते राज्यात सभा घेणार आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून राज्यात राष्ट्रीय नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर प्रचाराने वेग घेतला आहे. कोल्हापूरमध्ये प्रचाराचे नारळ फुटल्यानंतर काल मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त सभा झाली. विदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा धडका सुरू आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना सुरुवात होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात एकूण ९ सभा होणार आहेत.

शुक्रवारी दुपारी १२ वाजता धुळे व नंतर २ वाजता नाशिकला तपोवन मैदानावर त्यांची सभा होणार आहे. यासाठी १ लाख लोकांना बसता येईल, एवढा मंडप आणि व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, काँग्रेसनेही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्व वरिष्ठ नेत्यांची फौज उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी तसेच शेजारील कर्नाटक आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यभरात सभा होणार आहेत. या नेत्यांच्या प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली.

आज टिळक भवन येथे चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार समितीची बैठक पार पडली. त्यानंतर चेन्नीथला यांनी काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभांबाबत माहिती दिली. मल्लिकार्जुन खरगे हे ५ दिवस महाराष्ट्राच्या दौ-यावर असून त्यांच्या १३, १४, १६, १७ आणि १८ नोव्हेंबरला राज्यातील विविध भागात सभा होतील.

राहुल गांधी हे १२, १४ आणि १६ नोव्हेंबर रोजी प्रचारसभा घेणार आहेत. प्रियांका गांधी या १३, १६ आणि १७ नोव्हेंबरला प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेसचे देशभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत, असे चेन्नीथला म्हणाले.

आठवडाभरात मोदींच्या ९ सभा
नरेंद्र मोदींच्या या दौ-यात उत्तर महाराष्ट्रात २ सभा होणार आहेत. त्या पैकी, नाशिकला एक आणि धुळ्याला एक सभा होईल. ९ नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, १३ नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि १४ नोव्हेंबर रोजी संभाजीनगर, नवी मुंबई व मुंबई या ठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत.

भाजपच्या खोट्या जाहिरातींविरुद्ध तक्रार
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या गॅरंटी सरकार येताच लागू केल्या जातील. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसच्या गॅरंटी विरोधात चुकीच्या आणि अफवा पसरवणा-या खोट्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अनेक वर्तमानपत्रांत ही जाहिरात कोणी दिली त्याचे नाव नाही. या विरोधात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR