19.1 C
Latur
Thursday, November 7, 2024
Homeनांदेडअज्ञात जमावाने फोडली लक्ष्मण हाकेंची गाडी

अज्ञात जमावाने फोडली लक्ष्मण हाकेंची गाडी

नांदेडच्या बाचोटी गावातील घटना

नांदेड : लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील त्यांच्या प्रचारासाठी आलेल्या ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आंदोलन करणा-या लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आल्याची घटना गुरुवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या कारच्या मागच्या बाजूच्या काच फोडण्यात आल्याचे दिसून आले.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी इथे हा प्रकार घडल्याची माहिती असून बाचोटी येथून जात असताना काही जणांनी तोंड बांधून हल्ला केला असल्याची लक्ष्मण हाके यांनी दिली. ओबीसींनी त्यांच्या हक्कांचे रक्षण करायचे नाही का, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. आमच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला असे हाके यांनी म्हटले.

हाके यांनी याप्रकारासंदर्भात बोलताना हा हल्ला भ्याड आणि जीवघेणा हल्ला असल्याचे म्हटले. आमचा जीव घेऊन कुणाचे ध्येय साध्य करायचे असेल तर तयार आहोत, असे हाके म्हणाले. आमने सामने यायची हल्लेखोरांमध्ये धमक नाही. यांच्यात समोरासमोर येऊन लढायचा दम नाही. बाचोटी गावातील तरुण होते, त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. जरांगेंच्या नावाने घोषणा देत होते. आता निवडणुकीतून माघार घ्यायची का? उद्या आम्हाला मतदानाला बाहेर पडू दिले जाणार की नाही, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. कंधार तालुक्यातील पोलिसांना माहिती देऊनही वाय दर्जाची सुरक्षा असूनही एक कॉन्स्टेबल नव्हता, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

लातूरमध्ये पोलिसांनी संरक्षण दिले होते, नांदेडमध्ये एकही पोलिस संरक्षणाला नव्हता, असे लक्ष्मण हाके म्हणाले. आमच्या गाड्या त्या गावातून पास होत असताना गाड्या अडवण्यात आल्या, असे हाके म्हणाले. उद्या कंधार पोलिस स्टेशनवर मोर्चा काढणार आहोत, असेही ते म्हणाले. हल्लेखोरांना अटक होईपर्यंत कंधार पोलिस स्टेशनजवळ ठिय्या आंदोलन करणार आहोत, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR