मुंबई : प्रतिनिधी
एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांना यंदा दिवाळी भेट आणि अग्रिम रक्कम मिळणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे एसटी कर्मचा-यांत नाराजी वाढली होती. या पार्श्वभूमीवर आज एसटीचे वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची बैठक झाली. या बैठकीत निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यास दिवाळी भेट देण्याचे महामंडळाने मान्य केले. त्यामुळे एसटी कर्मचा-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मुंबईत झालेल्या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख आणि इतरही काही अधिकारी उपस्थित होते तर मान्यताप्राप्त संघटनेकडून राज्य अध्यक्ष संदीप शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघटनेकडून दिवाळी भेट व उचलबाबत आक्रमक भूमिका घेतली.
दिवाळी भेटीची मागणी आचारसंहितेपूर्वीची असून त्याला बोर्डाच्या बैठकीतही आधीच मंजुरी मिळाली. त्यामुळे दिवाळी भेट आणि उचल आचारसंहितेशी जोडणे चुकीचे आहे, अशा शब्दांत संघटनेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी महामंडळाकडून संघटनेला तांत्रिक अडचणी समजावून सांगण्यात आल्या.
एसटी कर्मचा-यांना दिवाळी भेट हा कर्मचा-यांचा हक्क आहे. त्यामुळे एसटी कर्मचा-यांना दिवाळी भेट व अग्रिम रक्कम द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीत सहभागी विविध कामगार संघटना आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ, महाराष्ट्र यांनी केली होती. त्यावर महामंडळानेही दिवाळी भेट व अग्रिम देण्याबाबतची प्रक्रिया दिवाळीच्या एक दिवसापूर्वी सुरू असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात दिवाळी भेट मिळालीच नाही.
निवडणूक आयोगाला साकडे घालणार
संघटनेच्या मागणीवरून एसटी महामंडळाने निवडणूक आयोगाला साकडे घालण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार असल्याचे सांगण्यात आले. निवडणूक आयोगाने दिवाळी भेट देण्याला मंजुरी दिल्यास या निधीचे वाटप करण्याचे मान्य केले.