नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी मागच्या काही महिन्यांपासून सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर सरन्यायाधीश यासंदर्भात दिशानिर्देश देतील, असे वाटत होते. परंतु आता ही सुनावणी नव्या पीठासमोर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत होती. परंतु आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ संपण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण एका नव्या खंडपीठाकडे वर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणावर गेल्या काही महिन्यांपासून कोणतीही सुनावणी झालेली नाही.
त्यामुळे पुढील आठवड्यात तरी याबाबत दिशानिर्देश दिले जातील, असे वाटत होते. परंतु अजूनही याबाबत सुनावणी न झाल्याने सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पीठासमोरील सुनावणीची शक्यता आता जवळपास मावळली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ३९ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. या अगोदर विधानसभा अध्यक्षआंनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविले नव्हते.
त्यामुळे यासंदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. शरद पवार यांच्या गटाने अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. त्यानंतर जयंत पाटील यांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
नवीन पीठासमोर होणार सुनावणी?
आमदार अपात्रतेची सुनावणी मागच्या ब-याच महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर हे प्रकरण नव्या पीठासमोर ठेवले जाण्याची शक्यता आहे.