मुंबई : शरद पवारांनी बारामतीत निवडणूक न लढण्याबद्दल विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर निवृत्तीबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. याबद्दल एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
या विधानामागची भूमिका स्पष्ट करताना शरद पवारांनी त्यांच्या राजकीय निवृत्तीबद्दल भाष्य केले. शरद पवार यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. तुम्ही मध्यंतरी म्हटलात की तुम्हाला निवडणुकीच्या राजकारणात रस नाही. तुम्ही निवृत्तीचे संकेत दिले असे म्हटले गेले असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्याला शरद पवारांनी उत्तर दिले.
मी तसे नाही म्हटले. मी असे म्हटले… मी सांगत हे होतो की, माझ्या कुटुंबाचा विषय होता तो. मी २५-३० वर्षे, माझ्यानंतर २५-३० आणि त्यानंतर पुढची २५-३० वर्षासाठी एक पिढी तयार करावी, ही माझी त्यातली इच्छा होती असे शरद पवार म्हणाले. आता माझ्या पुरता बोलत असताना मी हे सांगितले की, मी आता निवडणूक लढणार नाही. हे आजच नाही, २०१४ पासून मी निवडणूक लढलो नाही. मी राज्यसभेवर गेलो. निवडणुकीला स्वत: उभे राहिलो नाही. माझ्या मतदारसंघात सुप्रिया उभी राहिली चार वेळा. म्हणजे थेट निवडणुकीच्या प्रक्रियेत मी थांबायचे ठरवले आहे असे शरद पवार म्हणाले.
समाजकारणापासून बाजूला राहणार नाही
मी आता हा विचार करतोय की, माझी दोन वर्षांनी टर्म संपेल. त्यावेळी विचार करूया की, जायचे की नाही. याचा अर्थ ज्या पद्धतीने मांडले गेले की, हे असे असे संकेत आहेत. प्रश्न असा आहे की, निवडणुका लढणे वेगळे आणि राजकारणात सातत्य ठेवणे वेगळे. मी राजकारण आणि समाजकारण यापासून बाजूला राहणार नाही. ते मी करतच राहीन जोपर्यंत मला शक्य आहे, तोपर्यंत, अशी भूमिका मांडत पवारांनी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले.