हिंगोली : राज्यात महायुतीच्या प्रचार सभांना उत्स्फूर्तपणे होणारी जनतेची गर्दी हेच आमच्या विजयाचे प्रतिक असून राज्यात महायुतीचे सरकारच विकास करणार असल्याची ग्वाही देऊन राज्यात सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारे महायुतीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी सर्वांनी आशीर्वाद रुपी मतदान करावे असे आवाहन भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी ८ नोव्हेंबरला सेनगाव येथे सभेमध्ये बोलताना केले आहे.
सेनगाव येथे ८ नोव्हेंबर रोजी हिंगोली विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रचारानिमित्त आठवडी बाजारात भाजपच्या आमदार पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी आमदार महंत बाबुसिंग महाराज, भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, डॉक्टर विठ्ठल रोडगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, कैलास काबरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष दिवाकर माने, मिलिंद यंबल, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे मा.जि.प.अध्यक्षा सरोजिनी ताई खाडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली देशाचा, राज्याचा विकास झाला. देशापासून सुरु झालेला विकास मतदार संघापर्यंत आला आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. राज्यात विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला असून मोठ्या संख्येने विकास कामेही झाली आहेत. आम्ही केवळ बोलून दाखवत नाही तर ते करून दाखवतो. आमदार तानाजी मुटकुळे यांनी देखील दहा वर्षाच्या काळात शासनाकडे मतदार संघाचा विकास करण्याकरता वेळोवेळी पाठपुरावा केल्याने कोट्यवधी रुपयाचा निधी प्राप्त झाला त्यातूनच मतदारसंघात त्यांनी कायापालट केला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या विरोधात अफवा पसरविण्यात आल्या होत्या. विरोधकांनी फेक निरेटीव्ह पसरविले होते. विरोधकांच्या अपप्रचाराला जनता बळी पडली त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र कमी पडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या अपप्राचाराला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जातीधर्मांना घेऊन चालणारे सरकार स्थापन करायचे असून त्यासाठी जनतेने महायुतीच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले. महायुतीच्या सभेला होणारी गर्दी हेच विजयाचे प्रतिक असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लागू केली. त्यावेळी विरोधकांनी शासनाच्या निधीची उधळपट्टी केली असल्याचा आरोप करून ही योजना अंमलात आणू नये यासाठी न्यायालयात दाद मागितली; परंतु न्यायालयाने सुद्धा या योजनेबाबत सकारात्मकता दाखवली. त्यामुळेच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला रक्कम टाकली जात आहे.
यासाठी आता लाडक्या बहिणींनी आमदार तानाजी मुटकुळे यांना मतदानातून आशीर्वाद द्यावा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी शेवटी केले या सभेला हिंगोली व सेनगाव येथील भाजपा व महायुतीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.