वाशिम : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. परिणामी, भाजपची कोंडी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्याला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा विरोध आहे. पण यांनी किती ही जोर लावला तरी आम्ही नामांतर करणारच असे शाह म्हणाले होते. त्यात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुणतू सुजात आंबेडकरांनी नवी मागणी केली आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठा पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबाबत भाजप किती आत्मीयता आहे हे सांगत आहे. असे असताना दुसरीकडे बाबासाहेबांच्याच पणतूने औरंगाबादच्या नामांतराबाबत केलेल्या मागणीचे भाजप काय करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
औरंगाबादच्या नामांतराच्या वादात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी औरंगाबादचे नाव बदलण्याला विरोध केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य हे पुण्यातून होते. त्यामुळे आपल्याला जर संभाजी महाराजांचा आदर करून एखाद्या शहराला नाव द्यायचं असेल, तर ते नाव पुण्याला द्यायला पाहिजे. पुण्याचं नावं छत्रपती संभाजीनगर केलं पाहीजे. शिवाय औरंगाबादचं नाव औरंगाबाद राहू दिलं पाहीजे, असं सुजात आंबेडकरांनी सांगितलं. वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदार संघाचे वंचितचे उमेदवार प्रशांत गोळे यांच्या प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याला आता भाजप कशा पद्धतीने हाताळणार हे पहावयाचे.