नवी दिल्ली : देशाचे निमलष्करी दल (सीआरपीएफ)च्या अधिका-यांच्या रेशन भत्त्यावर कात्री चालविण्यात आली आहे. यामुळे या अधिका-यांना दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान होणार आहे. यामुळे अधिका-यांत नाराजी असून त्यांनी सरकारचे हे पाऊल मनोबल खच्ची करणारे असल्याचे म्हटले आहे.
सीआरपीएफच्या ग्राऊंड कमांडर म्हणजेच सहाय्यक कमांडट ते कमांडंटपर्यंतच्या अधिका-यांच्या रेशन मनी भत्ता बंद करण्यात आला आहे. सीआरपीएफमध्ये ड्यूटी बटालियन सोडून इतर अधिका-यांचा हा भत्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे या अधिका-यांचे सरासरी ४००० रुपयांचे नुकसान होणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलिसांच्या ३ डिव्हिजनमध्ये देखील अशाच प्रकारचे आदेश काही दिवसांपूर्वी जारी केले आहेत. यानंतर सीआरपीएफ महासंचालकांनी शुक्रवारी हे आदेश जारी केले आहेत. या अधिका-यांना १ नोव्हेंबरपासून हा भत्ता दिला जाणार नाही.
चार वर्षांपूर्वी सीआरपीएफच्या ९ रँकवर तैनात असलेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांना डिटॅचमेंट अलाऊन्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहो. यावेळी हे कर्मचारी जर रेशन मनीसाठी पात्र असतील तर त्यांना हा भत्ता देखील दिला जाणार असल्याचे आदेश काढले होते. सीआरपीएफमध्ये आता फक्त डयुटी बटालियनमध्येच रेशन मनी भत्ता मिळणार आहे. ड्युटी बटालियनमधून इतरत्र नियुक्ती झाल्यास अधिका-यांना रेशनचे पैसे मिळणार नाहीत. सध्याच्या व्यवस्थेत दलाच्या कोणत्याही संस्थेत आणि कुठेही नियुक्ती केल्यास रेशन भत्ता दिला जात होता.