22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानात बॉम्बस्फोट, २१ जणांचा मृत्यू

पाकिस्तानात बॉम्बस्फोट, २१ जणांचा मृत्यू

कराची : वृत्तसंस्था
पाकिस्तानमध्ये स्फोटाची मोठी घटना घडली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉम्बस्फोटावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या स्फोटाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट रेल्वे स्टेशनवरील बुकिंग कार्यालयात झाला. ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यापूर्वी हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. रेल्वे अधिका-याने सांगितले की, जाफर एक्स्प्रेस सकाळी ९ वाजता पेशावरसाठी रवाना होणार होती. स्टेशनवर मोठी गर्दी होती त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही घटना आत्मघाती हल्ल्यासारखी वाटत आहे.

पोलिसांकडून या स्फोटाचा तपास सुरू आहे. दावा केला जात आहे की, क्वेट्टामध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले. पहिल्या स्फोटामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला. तर दुस-या स्फोटामध्ये १५ ते २६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय येथे फुटीरतावादी बंडखोरीही वाढत आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष सय्यद युसूफ रझा गिलानी यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR