छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात सतत दोन तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल तातडीने शासनास सादर करावा असे निर्देश पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिका-यांना दिले.
तसेच, नुकसानीचे पंचनामे करत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घावी. पंचनामे करतांना कुठेही भेदभाव होणार नाही, कोणताही शेतकरी सुटणार नाही. तो शेतकरी कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पक्षाचा आहे यापेक्षा तो शेतकरी असल्याचे लक्षात ठेवावे, अशा सूचना अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत.
गेल्या दोन तीन दिवसांपासून झालेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. आज गुरुवार रोजी अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील विविध गाव शिवारातील नुकसानीची पाहणी केली. तसेच झालेल्या नुकसानीचा शेताच्या बांधावर जाऊन आढावा घेतला. याप्रसंगी अब्दुल सत्तार यांनी अधिका-यांना काही सूचना देखील दिल्या.
सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतक-यांनी धीर धरावा, सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे याबाबत लवकरच निर्णय घेतील अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांना धीर दिला.