23.3 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रश्रीमंत उमेदवारांकडून इव्हेंट कंपन्यांना हायर

श्रीमंत उमेदवारांकडून इव्हेंट कंपन्यांना हायर

मुंबई : प्रतिनिधी
सध्या विधानसभा निवडणुकीचा धुमधडाका सर्वत्र सुरू आहे. प्रचार यंत्रणा जोमात असून अनेक लोकांना निवडणुकीच्या काळात हाताला काम लागले आहे. राजकीय परिस्थिती पाहता उमेदवारच एकनिष्ठ राहिलेले नसल्याने प्रामाणिक कार्यकर्ते मिळणेही दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांची उणीव भरून काढण्यासाठी, अन् हायटेक प्रचाराद्वारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून इव्हेंट कंपन्यांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक हंगामात इव्हेंट कंपन्यांचा धंदा तेजीत आला आहे.

पूर्वी उमेदवारासोबत भेळभत्ता खाऊन काम करणारे कार्यकर्ते असायचे, आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले असून, कार्यकर्त्यांसाठी उमेदवाराला मोठा खर्च करावा लागत आहे. या खर्चाच्या तुलनेत इव्हेंट कंपन्या कमी खर्चात काम करण्यास तयार असल्याने उमेदवारांकडून इव्हेंट कंपन्यांवर मोठी जबाबदारी टाकली जात आहे. सर्व्हेपासून प्रचारापर्यंत, भाषणे लिहून देण्यापासून ‘ऑल अंडर वन रूफ’ कामकाजापर्यंत सर्वच कामे करण्यास इव्हेंट कंपन्या तयार आहेत.

यामुळे जिल्ह्यातील अनेक श्रीमंत उमेदवारांकडून इव्हेंट कंपन्यांना हायर करण्यात आले आहे. निवडणूक कार्यालयात जाऊन उमेदवाराच्या कागदपत्रांची पूर्तता करणे, पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून घेणे, प्रचारपत्रकांची छपाई करून आणणे आदी कामे या कंपन्या करून देत आहेत.

याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे, प्रचारपत्रके पोहोचविणे, लाऊडस्पीकरवरून उमेदवाराचा प्रचार करणे, वाहनांवर स्लाईड बसवून उमेदवाराचा, पक्षाचा प्रचार करणे, पदयात्रा सुरू असतानाच त्याचे व्हीडीओ तयार करून सोशल मीडियार अपलोड करणे, उमेदवाराच्या दैनंदिन खर्चाचा हिशेब ठेवणे, मतदारांपर्यंत मतदानाच्या स्लीप पोहोचविणे आदी कामे इव्हेंट कंपन्यांकडून केली जात आहेत.

प्रचाराचा व्याप अन् मतदानासाठी उरलेले अवघे १० दिवस बघता, उमेदवाराला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे शक्य नाही. अशा परिस्थितीत इव्हेंट कंपन्या उमेदवारासाठी देवदूत ठरल्या आहेत. उमेदवाराचे व्हीडीओ संदेश, प्रचारदौरे, रॅली, सभांमधील भाषणे त्वरित रेकॉर्ड करून त्यांचे व्हीडीओ सोशल मीडियावर अपलोड करणे आदी कामे या कंपन्या करत आहेत. कार्यकर्त्यांना तेवढा सोशल अवेअरनेस नसल्याने त्यांची जागा इव्हेंट कंपन्यांनी घेतली आहे.

सोशल मीडियावर उमेदवाराचा हायटेक प्रचार
व्हॉट्सऍप, फेसबुक, एक्स आदी सोशल मीडिया साईटवर उमेदवाराचा हायटेक प्रचार करणे, उमेदवारांच्या प्रचाराची गाणी तयार करणे ही कामे इव्हेंट कंपन्यांकडून केली जात आहेत. यासाठी इव्हेंट कंपन्यांकडून स्वतंत्र वॉररूमची स्थापना करण्यात आली आहे.

मतदान स्लीप वाटण्याचे काम महाविद्यालयीन युवकांकडे
प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत उपनगरांतील प्रचार कार्यालयात मतदारांना मतदानाच्या स्लीप वाटण्यात येतात. मतदाराचे मतदान कुठल्या बूथवर, कुठल्या खोलीत आहे हेदेखील स्लीपवर लिहून दिले जाते. मतदाराची माहिती निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन साईटवर शोधून त्यास ती पुरविण्याची जबाबदारीही या इव्हेंट कंपन्यांकडून घेतली जाते. काही वेळेला यासाठी महाविद्यालयीन युवकांची मदतही घेतली जाते, यासाठी त्यांना विशेष मेहनताना दिला जातो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR