सोलापूर : जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) सुरळीतपणे पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, योजनाचे शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी बहुतेक केंद्रांना भेटी दिल्या.
विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यंदा तीन वर्षांनंतर रविवारी सुरळीत पार पडली. सोलापूर जिल्ह्यातील ३५ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी १२ हजार ९९२ भावी शिक्षकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९११ उमेदवार परीक्षेला येऊ शकले नाहीत.
‘टीईटी’तील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. त्याद्वारे परीक्षा केंद्रावरील प्रत्येक उमेदवारांची फेस रींिडग, बायोमेट्रिक, मेटल डिटेक्टर असे उपाय करण्यात आले होते. प्रवेशपत्रासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र यापैकी एखादे मूळ ओळखपत्र पाहूनच केंद्रावर प्रवेश देण्यात आला. पेपर दोनसाठी स्वतंत्र प्रवेशपत्र, स्वतंत्र बैठक क्रमांक होता.
प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता.
सर्वांचीच तपासणी होणार असल्याने उमेदवारांना परीक्षा वेळेपूर्वी दीड तास आधी बोलावले होते. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टीईटी’साठी चोख पोलिस बंदोबस्त दिला होता. कोणत्याही गैरप्रकाराशिवाय परीक्षा सुरळीत पार पडल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले. टीईटी परीक्षेसाठी एकूण १२,९९२ परीक्षार्थी होते. एकूण ३५ परीक्षा केंद्रे होती १२,०८१विद्यार्थ्यांची परीक्षेला उपस्थिती होती. ९११परीक्षार्थी गैरहजर होते.