सोलापूर : पावसाने खराब झालेला कांदा, अवकाळी पावसाचा अंदाज आणि निर्यातबंदीची धास्ती, या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढू लागली आहे. सोलापूर बाजार समितीत ४७९ गाड्या कांदा विक्रीसाठी आला होता. त्यावेळी सरासरी भाव ३२०० रुपयांवरून थेट २६०० रुपयांवर आला होता. बाजारात सध्या ओला कांदा विकायला येत असून, त्यात पावसाने खराब झालेला कांदा देखील जास्त आहे.
गतवर्षी निर्यातबंदीचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने यंदा विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा निर्यातबंदी होईल की काय, अशी धास्ती त्यांना आहे. मागील दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी पावसाळ्याच्या सुरवातीला कांदा लावला. पण, सततच्या पावसामुळे तसाच्या तसा कांदा जागेवरच खराब झाला. ज्या एकरात १५० ते २०० पिशव्या निघतील असा अंदाज असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती अवघ्या २० ते २५ पिशव्याच लागल्या. मागील १५ दिवसांत बाजार समितीत जेवढा कांदा विक्रीसाठी आला, त्यातील ३० टक्के कांदा हा पावसाने खराब झालेलाच होता, असे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्या कांद्याला प्रतिकिलो ५० पैसे दर मिळाला. आता बाजार समितीत ओला कांदा विक्रीसाठी वाढत असून त्यामागे अवकाळी पावसाची भीती व निर्यातबंदीची धास्ती असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच कांद्याचा सरासरी दर कमी झाला असून, सध्या ओल्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी २६०० रुपयांचा दर आहे. सुकलेल्या जुन्या कांद्याला ४२०० ते ५२०० रुपयांपर्यंत दर आहे.
सोलापूर बाजार समितीत कांदा घेऊन येणाऱ्या वाहनांना दुपारी चारनंतर दोन नंबरच्या गेटमधून आत सोडले जाते. पण, रात्री १२ नंतर त्या वाहनांना कांदा बाजारात प्रवेश दिला जातो. सकाळी १० वाजल्यापासून कांद्याचे लिलाव सुरू होतात. लिलावानंतर शेतकऱ्यांना १५ हजारांपर्यंत रोखीने दिले जातात व उर्वरित रकमेचा धनादेश दिला जातो. त्यावर १५ ते २० दिवसांची मुदत टाकली जाते, अशी वस्तुस्थिती आहे.