मुंबई : विशेष प्रतिनिधी
सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे जाणार याचा निर्णय १५८ मतदारसंघ करणार आहेत. या १५८ मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदे यांची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. त्यामुळे १५८ मतदारसंघाचा कौल भाजप सरस की काँग्रेस, खरी शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची, ओरिजनल राष्ट्रवादी दादांची की साहेब याचा फैसला होणार आहे. त्यामुळे या थेट लढती निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत आणि मतदारांसाठी लक्षवेधी ठरत आहेत.
दोन प्रमुख आघाड्यांमध्ये तीन-तीन पक्ष
२०१९ पर्यंत महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये दोन दोन पक्ष होते. त्यामुळे प्रामुख्याने भाजप राष्ट्रवादी विरोधात तर काँग्रेस शिवसेना विरोधात निवडणूक लढवत होती. मात्र, २०१९ नंतरच्या बदललेल्या समीकरणात राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख अलायन्समध्ये तीन-तीन पक्ष झाले. दोन्ही बाजूचे दोन दोन पक्ष तर एक प्रमुख पक्ष फुटून तयार झालेले दोन गट असे आहेत. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे अशा थेट लढतीचे समीकरण निर्माण झाले आहे.
अशा आहेत राज्यातील थेट लढती …
– राज्यातील तब्बल ७५ मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत
– भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत विदर्भातील ३५, मराठवाड्यातील १०, पश्चिम महाराष्ट्रातील १२, मुंबईतील ८, उत्तर महाराष्ट्रातील ६ आणि कोकणातील ४ अशा मतदारसंघात आहे.
– दुसरी थेट लढत दोन्ही शिवसेनेमध्ये होत आहे. शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या सेनेसमोर तब्बल ४६ मतदारसंघात उभी ठाकली आहे.
– विदर्भात ५ मतदारसंघात दोन्ही शिवसेना समोरासमोर आहेत. मराठवाड्यात १०, पश्चिम महाराष्ट्रात ८, मुंबईत १०, उत्तर महाराष्ट्रात ४ आणि कोकणात ९ मतदारसंघात दोन्ही शिवसेना समोरासमोर आहेत.
– राज्यातील ३७ मतदारसंघात काका आणि पुतण्यांच्या राष्ट्रवादीत आपापसात संघर्ष होत आहे…
– दोन्ही राष्ट्रवादी विदर्भात ३ मतदारसंघात, मराठवाड्यात ६ ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रात तब्बल २१ ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे संघर्ष होणार आहे.
– मुंबईत १, उत्तर महाराष्ट्रात ३ आणि कोकणात ही ३ ठिकाणी काका-पुतण्यांचे पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत.
३८ ठिकाणी भाजपसमोर राष्ट्रवादीचे उमेदवार
दरम्यान, ३८ मतदारसंघ असे आहेत, जिथे भाजप उमेदवारांसमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांचा कौलही मत्त्वाचा ठरेल. शिवाय ३४ मतदारसंघात भाजपचे उमेदवार कधीकाळी मित्र पक्ष राहिलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांशी दोन हात करणार आहेत. १९ मतदारसंघात शिंदेंचे शिवसैनिक काँग्रेस समोर उभे आहेत. त्यामुळे हे मतदारसंघही राज्याच्या सत्तेचा निकाल निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सर्वाधिक थेट लढती विदर्भात होत आहेत. दोन्ही शिवसेनेमधील सर्वाधिक थेट लढती मुंबई आणि कोकणात होत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्वाधिक थेट लढती स्वाभाविकपणे पवारांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात होत आहेत.