सोलापूर : आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईमध्ये अवैध बनावट देशी विदेशी मद्य वाहतूक करणारी बारा वाहने पकडली. यामध्ये 15 लाख 63 हजार 313 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ढाब्यांवर दारू पिणाऱ्यांना 2 लाखाचा दंडही ठोठावला. विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर याच्या निर्देशानुसार सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये केलेल्या कारवाईत 15 गुन्हे नोंद करण्यात आले.
13 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन हजार 700 लिटर गूळमिश्रित रसायन, 593 लि. हातभट्टी दारु, 26.25 ब.लि. देशी मद्य, 84.96 विदेशी मदय, 15.6 ब.लि बिअर तसेच 77.76 ब.लि बनावट विदेशी मद्य जप्त करण्यात आले. बारा वाहने जप्त करण्यात आली असून त्यामध्ये एक चारचाकी वाहन, एक अॅटोरिक्षा व दहा मोटारसायकलसह एकूण 15 लाख, 63 हजार, 313 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक आर. एम. चवरे, जे. एन. पाटील, ओ. व्ही. घाटगे, डी. एम. बामणे, पंकज कुंभार, भवड, मारुती मोहीते तसेच दुय्यम निरीक्षक, आर. एम. कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सिद, अंजली सरवदे, मुकेश चव्हाण, मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, नंदकुमार वेळापूर यांनी पार पाडली.