लातूर : निवडणूक डेस्क
२३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथींचा दुसरा पार्ट सुरू होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच नवी समीकरणं उदयास येतील. त्यातही महायुतीमधून अजित पवार आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यात मागच्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्या गटातील काही नेत्यांनी केलेल्या सूचक विधानांमुळे चर्चांना बळ मिळालं आहे.
नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून अजित पवार गट आणि भाजप आमने-सामने आले. रोड शोच्या माध्यमातून अजित पवार गटाने महायुतीमध्ये यापुढे भाजपाचं फार ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेलाही अजित पवार यांनी विरोध केलाय. त्यामुळे पुढच्या काळात अजित पवार गट आणि भाजपमधील संघर्ष अधिक तीव्रही होऊ शकतो.
येत्या २३ तारखेनंतर २०१९ सारखी नवी समीकरणं समोर येऊ शकतात, अशी विधानं नवाब मलिक यांनी केली. केवळ नवाब मलिकच नाही तर दिलीप वळसे पाटील यांनीही असंच विधान केलं आहे. निवडणूक झाल्यावर आघाडी येते की युती येते यापेक्षा प्रत्येक पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे महत्त्वाचं ठरणार असून, त्यानंतर खरं गणित सुरू होणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर, अजित पवार यांना सोबत घेणं सध्या शक्य नसल्याचं सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पण त्यामधून अजितदादांसाठी परतीचा मार्ग पूर्णपणे बंद झालाय, असं मात्र काही त्यांनी म्हटलेलं नाही. त्यामुळे निकालांनंतर निर्माण होणा-या परिस्थितीत जुळवाजुळवीला वाव आहे.
अजित पवार यांच्या भूमिकेविषयी ३ शक्यता
– पहिली शक्यता म्हणजे सध्या सत्तेवर असलेली महायुती कशीबशी १४५ जागांपर्यंत पोहोचली, तसेच त्यात अजित पवार यांच्याकडे आमदारांची समाधानकारक संख्या असेल तर अजित पवार हे ‘किंगमेकर’च्या भूमिकेत जातील. तसेच सरकारमध्ये मोठा वाटा मागतील. मात्र महायुती सोडणार नाहीत.
– दुसरी शक्यता म्हणजे शिंदे गट आणि भाजपला एकत्रितपणे बहुमताच्या १४५ या आकड्याजवळ पोहोचता आले नाही तर महायुतीमधील अजित पवार यांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच परिस्थितीचा अंदाज घेऊन ते मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
– तिसरी शक्यता म्हणजे अजित पवार यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या आकड्यामुळे महाविकास आघाडी बहुमताच्या पार जाणार असेल तर शरद पवार हे अजित पवार यांना महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. या परिस्थितीत अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण करून मुख्यमंत्रिपद देण्याची ऑफर दिली जाऊ शकते किंवा स्वत: अजित पवार हे मुख्यमंत्रिपदाची मागणी करू शकतात.