उरण : घनशाम कडू
उरण विधानसभेचा अर्धा भाग म्हणजे खालापूर तालुक्यातील वासांबे, वडगाव आणि चौक जिल्हा परिषद गट मतदारसंघासाठी निर्णायक ठरत आहे. २०१९ मध्ये अपक्ष असलेले महेश बालदी यांना आमदारकीच्या खुर्चीत बसवले होते. यंदा बालदी महायुतीत असून भाजपमधून निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर व शेकापचे प्रितम म्हात्रे हे रिंगणात आहेत. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
२००९ मध्ये उरण विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून झालेल्या तीनही निवडणुकीत इथल्या मतदारांनी वेगवेगळा कौल दिला आहे. २००९ ला शेकापचे विवेक पाटील, २०१४ ला शिवसेनेचे मनोहर भोईर आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजप बंडखोर अपक्ष लढलेले महेश बालदी यांना जनतेने निवडून दिले आहे. २०१४ च्या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांचा अवघ्या ८११ मताने निसटता पराभव झाल्यापासून शेकापला उतरती कळा लागली.
२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले मनोहर भोईर यांना २०१९ मध्ये महेश बालदी यांनी ५७१० मतांनी पराभूत केले होते. महेश बालदी यांना वासांबे, वडगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत झाली होती. त्यामुळे त्यांना विजयाची चव चाखता आली. २०२४ निवडणुकीत बालदी भाजपकडून अधिकृत उमेदवार असून, मनोहर भोईर हे ठाकरे गटाकडून त्यांच्याविरोधात लढत देत आहेत. शेतकरी कामगार पक्षाने अस्तित्व दाखवण्यासाठी प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, शेकापच्या घटलेल्या जनाधारामुळे त्यांचा निभाव लागणे कठीण आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शेकाप किती शिल्लक आहे, याचा अंदाज या निवडणुकीनिमित्ताने येणार आहे.
२०१९ ला पराभूत होऊनही ठाकरे गटाचे भोईर यांनी मतदारसंघात ठेवलेला जनसंपर्क यामुळे बालदी यांना निवडणूक सोपी जाणार नाही. प्रीतम म्हात्रे केवळ वर्षभरापूर्वी सक्रिय झाल्याने शेकापला उरण विधानसभा मतदारसंघात आपले मतदार चाचपणी करण्याची संधी मिळणार आहे. त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेकापला उमेदवार उभे करताना होणार आहे.