नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने शनिवारी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व पक्षांच्या नेत्यांची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी शनिवारी ही बैठक घेणार आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल सहभागी होऊ शकतात असे मानले जात आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होत असून ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
दरम्यान, संसदेच्या १५ बैठका होणार आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या अधिवेशनात वसाहती काळातील गुन्हेगारी कायद्यांमध्ये बदल करणाऱ्या तीन विधेयकांसह इतर महत्त्वाच्या कायद्यांवर विचार केला जाऊ शकतो. सध्या संसदेत ३७ विधेयके प्रलंबित आहेत. २०२३-२४ या वर्षासाठीच्या पुरवणी मागण्यांशी संबंधित प्रस्ताव लोकसभेत मांडण्याचीही सरकारची योजना आहे. तसेच महुआ मोइत्रा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आचार समितीचा अहवालही या संसदेच्या अधिवेशनात मांडला जाणार आहे.