20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeलातूरदलबदलूना धडा शिकवा

दलबदलूना धडा शिकवा

५० खोकेवाल्यांना घरी बसवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचे आवाहन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात रोज ७ शेतकरी आत्महत्या करत आहेत. मागील सहा महिन्यात तब्बल २३३६ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. हे आकडे महायुती सरकारनेच विधिमंडळात सांगितले आहे. याबाबत हे महायुती सरकार काहीच बोलत नाही. कारण हे खोटे बोलणा-यांचे सरकार आहे. त्यामुळे आता या ५० खोके घेणा-यांच्या सरकारला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. तर विचाराला तिलांजली देणा-या दलबदलूना धडा शिकवा, यासाठी मतदारांनी ही संधी गमवू नये, नाही तर हे सर्वसामान्य जनतेला संपवतील असे आवाहन करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची बुधवारी लातूर येथे जाहीर सभा पार पडली. त्या सभेत बोलताना खरगे यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, तेलंगणाचे सिंचन मंत्री तेलंगणाचे सिंचन मंत्री उत्तमकुमार रेड्डी, कुणाल चौधरी, राजेश राठोड, खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज विलासराव देशमुख, उदगीरचे उमेदवार सुधाकर भालेराव, औशाचे उमदेवार दिनकर माने, निलंग्याचे उमेदवार अभय साळुंखे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, वैजनाथ शिंदे, श्रीशैल उटगे, संतोष सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी शेतकरी कामगार पक्षाचे नेते उदय गवारे लातूर लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे माजी महापौर दीपक सूळ आदिसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खरगे पुढे म्हणाले, विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय नेते होते.

सतत हसतमुख राहणा-या विलासरावांनी आपल्या कामाच्या माध्यमातून मराठवाड्यासह राज्याचा चौफेर विकास केला. ज्यावेळी विलासराव बांधकाम विभागाचे खाते सांभाळत होते. त्यावेळचे विधानपरिषदेचे सभापती गवई यांनी विलासराव देशमुख हे एक यशस्वी मुख्यमंत्री होतील असे भाकीत केले होते. तेव्हा मी विचारात पडलो होतो, की एवढे दिग्गज नेते असताना देशमुख कसे काय मुख्यमंत्री होऊ शकतील. मात्र पुढे विलासरावांनी आपल्या कामाची छाप पाडून यशस्वीपणे एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व केले, अशी आठवण यावेळी मल्लिकार्जून खरगे यांनी लातूरकरांना सांगितली.

अमित देशमुखांनी विलासरावांचे नाव जपले
देशमुख कुटुंबियांचे कौतुक करताना खरगे म्हणाले की, आज मी ज्या ज्यावेळी अमित देशमुख यांना पाहतो. त्यावेळी मला विलासराव देशमुख यांची आठवण येते. त्यांच्या वागण्या बोलण्यात विलासरावांची छाप दिसून येते. अमित देशमुख यांनी विलासरावांचे नाव जपले आहे. तसेच धिरज देशमुख यांना पाहिल्यावर देखील आईसाहेबांची आठवण येते. त्याच प्रमाणे विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचे देखील अमित आणि धिरज देशमुख यांच्यावर आशीर्वाद आहेत. विलासरावांच्या माघारी त्यांनी एक कुटुंबप्रमुख म्हणून अतिशय चांगली जबाबदारी पार पडत चांगले संस्कार केले. कुटुंब एकत्र ठेवून देशमुख परिवार जनतेच्या सेवेत सक्रीय राहिला. यासाठी खरगे यांनी दिलीप देशमुख यांचेही कौतुक करत आभार मानले.

अमित देशमुख यांनी मतदारसंघात केलेल्या २४०० कोटींच्या विकास कामाचे ही खरगे यांनी कौतुक केले. ते मतदारसंघासाठी काम करतात त्याप्रमाणे ते पक्षासाठी देखील कष्ट घेत आहेत. त्यांनी लातूर जिल्ह्यातील सहा जागांवर विजय मिळवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ते महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही प्रचार करत असून त्या जागांवरही विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मोदी खोटे बोलणा-यांचे सरदार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाला १५ लाख देतो, असे आश्वासन दिले होते. तसेच यांचे सरकार २ कोटी रोजगार देणार होते, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. महिलांना मोफत गॅस देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. मात्र आज सत्तेत येऊन दहा वर्ष झाले तरी त्यांनी त्यांचे आश्वासन का पाळले नाही? असा सवाल करत नरेंद्र मोदी हे खोटे बोलणा-यांचे सरदार असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे.

मोदींनी सोयाबीनला दर का दिला नाही?
विलासराव देशमुख यांनी मराठवाड्याचा विकास केला. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्राधान्य दिले. त्यामुळेच लातूर आणि मराठवाडा हे संपन्न झाले आहे. परंतु आज केंद्रातील सरकारमुळे शेतक-यांच्या सोयाबीन दराचा प्रश्न गंभीर झाला आहे. येथील शेतक-यांना सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळत नाही. मोदी सरकारने सर्व काही वाढवले, महागाई वाढवली, प्रत्येक गोष्टीवर टॅक्स वाढवले, मग सोयाबीन कापसाचा दर का वाढवला नाही ? असा सवाल खरगे यांनी मोदी सरकारला केला. फडणवीस यांनी विरोधीपक्षात असताना सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देण्याची मागणी केली होती. मग आता सत्तेत असताना किती भाव देत आहेत. किमान ४८०० रुपये जो हमी भाव तो देखील दर शेतक-यांना मिळत नसल्याची टीका खरगे यांनी यावेळी फडणवीस यांच्यावर केली.

दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला : अमित देशमुख
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि लातूरच्या ऋणानुबंधाच्या आठवणीस उजाळा दिला. तसेच मागील पाच वर्षांत २४०० कोटींची विकासकामे केल्याचा उल्लेख त्यांनी करत दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढण्यासाठी आपण एकत्र आलो असल्याचे सांगत अमित देशमुख यांनी महिलांच्या खात्यावर ३००० रुपये तर सुशिक्षित बेरोजगारांना ४००० रुपये आर्थिक सहाय्य केले जाईल. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक नागरिकाचा २५ लाखापर्यंतचा विमा काढला जाणार आहे. औषधेही मोफत देण्याच्या महत्त्वाचा निर्णयही महाविकास आघाडीने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठवून त्यात वाढ करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची ग्वाही अमित देशमुख यांनी दिला. त्याचबरोबर या निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडीला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच येत्या २० तारखेला हाताच्या चिन्हाचे बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR