21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रकोथरूड, शिवाजीनगर, खडकवासल्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला!

कोथरूड, शिवाजीनगर, खडकवासल्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला!

पुणे : प्रतिनिधी
कोथरूड मतदार संघातील लढत ही एकूणच राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची ठरली असून खडकवासला मतदार संघात होणारी लढत तिरंगी पण तितकीच महत्वपूर्ण आहे.

कोथरूड : विधानसभा मतदार संघात विद्यमान उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे दुस-या वेळेस रिंगणात उतरले आहेत तर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मनसेचे किशोर शिंदे यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. या मतदार संघात सुमारे साडेचार लाखापेक्षा अधिक मतदार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत खासदार झालेले केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा सदस्य प्रा. मेधा कुलकर्णी हे याच मतदार संघातील आहेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी या मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. या निवडणुकीत अमोल बालवडकर यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. पण त्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश मिळाले. त्यामुळे मंत्री पाटील यांचा मार्ग मोकळा झाला.

या मतदार संघात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मागच्या निवडणुकीत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले होते त्यावेळी भाजप-सेनेची युती होती. येथे तिरंगी लढत उत्कंठावर्धक ठरणार असे दिसते.

खडकवासला : खडकवासला मतदार संघात देखील लक्षवेधी तिरंगी लढत होत आहे. दोन वेळा आमदार असलेले भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर राष्ट्रवादी कॉँंग्रेस पक्ष (शरद पवार) सचिन दोडके आणि मनसेचे मयूरेश वांजळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याखेरीज अन्य १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुमारे पावणे सहा लाख मतदार या मतदार संघात आहेत.

सन २००९ मध्ये रमेश वांजळे यांनी या मतदार संघातून विजय संपादन केला होता. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत भीमराव तापकीर यांनी सलग दोन टर्म विजय मिळविला आहे. या मतदार संघावर भाजपा आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन पक्षांचा विशेष प्रभाव आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत सचिन दोडके यांना यश मिळाले नाही म्हणून पुन्हा त्यांना पक्षाने संधी दिली. यावेळी मनसेचे उमेदवार मयूरेश वांजळे रिंगणात आहेत त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.

शिवाजीनगर : या मतदारसंघातून मनीष आनंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे तर महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट आणि अपक्ष मनीष आनंद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कॉँग्रेसचे दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. कसबा आणि पर्वती मतदार संघाप्रमाणे या मतदार संघात मत विभाजन होणार असल्याचे दिसते आहे. आमदार शिरोळे यांची ही दुसरी टर्म आहे. यापूर्वी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन आमदार अण्णा जोशी तसेच विजय काळे तर शिवसेनेचे तत्कालीन आमदार आणि माजी मंत्री शशिकांत सुतार, विनायक निम्हण यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR