संभाजीनगर : यंदाच्या निवडणुकीत मराठा आणि ओबीसीसह मुस्लिम मतदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. अशातच, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलील उर-रहमान सज्जाद नोमानी यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.
बोर्डाने घातलेली अट : यापूर्वी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला शनिवारी (९ नोव्हेंबर) १७ मागण्यांचे पत्र पाठवले होते. निवडणुकीत पाठिंबा हवा असेल, तर या मागण्या मान्य कराव्या लागतील असे त्या पत्रात लिहिले होते. प्रामुख्याने महाराष्ट्रातील ४८ जिल्ह्यांतील मशीद, दर्गा आणि स्मशानभूमीचे सर्वेक्षण आणि महाराष्ट्राच्या वक्फ बोर्डाच्या विकासासाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी, या मागणीचा त्यात समावेश आहे. महाविकास आघाडीला या मागण्या मान्य असतील, तर निवडणुकीत आम्ही निश्चितपणे पाठिंबा देऊ, असे मंडळाने आपल्या पत्रात स्पष्ट केले होते.
महायुतीला फटका : ऑल इंडिया उलेमा बोर्डाने घेतलेल्या या निर्णयामुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपला मुस्लिमांची फारशी मते मिळत नसली तरी, महायुतीत सामील असलेले अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला फटका बसू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा असतो, पण आता या निर्णयामुळे त्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.