21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeउद्योगरुपयाचे अवमूल्यन, सार्वकालिक नीचांकी पातळी गाठली

रुपयाचे अवमूल्यन, सार्वकालिक नीचांकी पातळी गाठली

अमेरिकेत नवे सरकार, सलग चौथ्या सत्रात रुपयाची घसरण, मोठी किंमत मोजण्याची वेळ

मुंबई : प्रतिनिधी
स्थानिक भांडवली बाजारात समभाग विकून परकीय गुंतवणूकदारांच्या सतत सुरू असलेल्या गमनामुळे रुपयाची सार्वकालिक नीचांकी पातळीवर घसरणीची मालिकाही कायम आहे. सलग चौथ्या सत्रात रुपयाचे प्रतिडॉलर मूल्य आणखी दोन पैशांनी घसरून ८४.३९ वर स्थिरावले. दरम्यान अमेरिकेत ट्रम्प राजवटीत रुपयाचे ८ ते १० टक्क्यांनी अवमूल्यन होण्याचा कयास व्यक्त करणारा अहवाल स्टेट बँकेने प्रसिद्ध केला. सातत्याने रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने भारत सरकारला याचा निष्कारण भुर्दंड सहन करण्याची वेळ आलेली आहे. कारण आयात मालासाठी भारताला मोठी किंमत मोजावी लागते.

सलग चौथ्या सत्रातील घसरण ही दौन पैशांवर सीमित राहिली. मध्यवर्ती बँकेच्या हस्तक्षेपामुळे चलनाला मोठे नुकसान टाळता आले आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे विनिमय मूल्य ८४.३९ वर स्थिरावले. या अगोदर सरलेल्या सप्ताहाअखेर शुक्रवारी रुपयाने ८४.३७ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर विश्राम घेतला होता. या आठवड्यात त्यात पुन्हा घसरण झाली.
आंतरबँक चलन व्यापारात, तेल कंपन्या आणि परदेशी बँकांकडून डॉलरच्या मागणीमुळे रुपया दबावाखाली राहिला. तथापि, रिझर्व्ह बँकेने डॉलरचा पुरवठा खुला करून रुपयावरील ताण हलका केल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

परकीय गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये भांडवली बाजारातून साधारण २०,००० कोटी रुपये काढून घेतल्याचा ढोबळ अंदाज आहे. ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले, त्यावेळी त्यांच्या ४ वर्षाच्या राजवटीत रुपयाचे मूल्य ११ टक्क्यांनी गडगडले होते. त्या तुलनेत यंदाची घसरण अल्प असेल. शिवाय रुपयाच्या ५ टक्के अवमूल्यनाचा महागाईवाढीच्या दृष्टीने पाव ते अर्धा टक्के म्हणजे किरकोळच असेल, असाही दावा केला जात आहे.

रुपयाच्या अवमूल्यनाचा धोका आणखी वाढला
प्रमुख सात जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरची मजबुती दर्शविणारा डॉलर निर्देशांकही १०५.३ वर चढला आहे. डॉलरच्या मजबुतीने परदेशी गुंतवणुकीच्या बा प्रवाहाला चालना दिली असून त्यातून रुपया आणखी खोलात लोटला जात आहे. ट्रम्प यांचे व्हाइट हाऊसमधील पुनरागमन हे रुपयाच्या मूल्यात ८-१० टक्क्यांच्या -हासास कारण ठरेल, असे ‘एसबीआय रिसर्च’ या स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.

डॉलर मजबूत स्थितीत?
ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेतील चलनवाढ आणि रोख्यांच्या परताव्यावर मर्यादा आणली जाईल. पर्यायाने तेथील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची पतधोरण आयुधांच्या वापराची व्याप्तीही मर्यादित केली जाईल. हे घटक डॉलरच्या मजबुतीसाठी आणखीच उपकारक ठरतील, असे आयएनजी बँकेने एका टिपणात मत व्यक्त केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR