वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सरकार चालवण्यासाठी आपली टीम तयार करण्याचे काम सुरू आहे. आता टेस्ला प्रमुख एलन मस्क आणि भारतीय वंशाचे उद्योगपती विवेक रामास्वामी यांच्याकडे मोठ्या जबाबदा-या सोपवल्या आहेत. मस्क आणि रामास्वामी हे सरकारच्या कार्यक्षमतेच्या विभागाचे नेतृत्व करतील. डीओजीई हा एक नवीन विभाग आहे, जो सरकारला बा सल्ला देईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत एक निवेदन जारी केले.
दोन अद्भूत अमेरिकन माझ्या प्रशासनासाठी नोकरशाही दूर करण्यासाठी, कचरा कमी करण्यासाठी, अनावश्यक नियम काढून टाकण्यासाठी आणि फेडरल एजन्सीची पुनर्रचना करण्यासाठी काम करतील. आमच्या ‘सेव्ह अमेरिका’ अजेंडासाठी हे महत्त्वाचे आहे. यासोबतच ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजचे होस्ट पीट हेगसेथ यांनाही त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद देण्यात आले आहे. डीओजीई विभागाबाबत बोलताना नवीन प्रणालीमुळे सरकारी पैशांची उधळपट्टी करणा-या लोकांमध्ये दहशत निर्माण होईल. हा आमच्या काळातील मॅनहॅटन प्रकल्प बनू शकतो, असे ट्रम्प म्हणाले.
रामास्वामींनी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारात मोठी भूमिका बजावली होती. मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारात ९०० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला. विवेक रामास्वामी फार्मास्युटिकल कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनीही ट्रम्प यांच्या प्रचारात मोठी भूमिका बजावली.