25.5 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रकांदा, सोयाबीनमध्ये अडकले राज्याचे राजकारण

कांदा, सोयाबीनमध्ये अडकले राज्याचे राजकारण

विदर्भ, मराठवाड्याला बसणार फटका

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
सोयाबीनचे पडलेले भाव यंदा सत्ताधा-यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात कांद्याने रडवले तर विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीन सत्ताधा-यांना कोंडीत पकडू शकते. खास करून मराठवाडा आणि विदर्भात याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला कांद्याने रडविले होते. कांद्याचे भाव कोसळल्याने संतापलेल्या शेतक-यांनी सहा लोकसभा मतदारसंघांत विरोधात कौल दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोयाबीनचे भाव कोसळले. तीन वर्षांपूर्वी सहा हजारांच्या घरात विकले जाणारे सोयाबीन आता तीन हजार रुपये क्विंटलने विकले जाते.

राज्यात मराठवाडा, विदर्भात सोयाबीन ३० लाख हेक्टरवर पिकवले जाते. सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या संतापाचा सामना जवळपास ६० ते ७० मतदारसंघांत करावा लागण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात लातूर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, संभाजीनगरमधील जवळपास सर्वच मतदारसंघांत फटका बसू शकतो.

विदर्भात यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांतील मतदारसंघांत सत्ताधा-यांना फटका बसू शकतो. सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निवडणुकांच्या काळात सत्ताधा-यांना ही नाराजी परवडणारी नाही.

सोयाबीनच्या दरावरून विरोधकसुद्धा आक्रमक झाले आहेत
सोयाबीनच्या दरावरून शेतक-यांमध्ये नाराजी असतानाही सत्ताधारी मात्र आम्हाला फटका बसणार नाही असे म्हणत आहेत. सत्ता येताच मुख्यमंत्री सगळं व्यवस्थित करतील असे विश्वास संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला.

कांद्याबाबत सरकारने जशी दक्षता घेतली तशी सोयाबीनच्या भावाबाबत सरकारने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत का असा सवाल उपस्थित होतोय. जर सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी आपला संताप मतपेटीतून व्यक्त केला तर महायुतीचे अवघड होऊन बसणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR