सांगली : विशेष प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील मिरज मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (१४ नोव्हेंबर) सभा घेतली. या सभेत पंकजा मुंडे यांनी भर सभेत नवस केला.
पश्चिम महाराष्ट्रातील मिरज मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. कामगार मंत्री सुरेश खाडे भाजपचे आमदार आहेत. खाडे २००४ साली सर्वप्रथम जतमधून निवडून आले. २००९ साठी मिरज मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर खाडे मिरजेतून सलग तीनदा निवडून आले. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय अशीही खाडेंची ओळख होती. त्यांच्या प्रचारासाठी पंकजा यांनी सभा घेतली.
पंकजा यांनी या भाषणात खाडे यांच्या कार्याची जोरदार प्रशंसा केली. खाडे यांनी पाण्याची सोय केली. म्हैसाळचे पाणी अजून सुरु आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळ टळला. सुरेश खाडे यांची पाचवी टर्म आहे,अजून काय पाहिजे? हे पर्मनंट आमदार असल्याचं प्रशस्तीपत्रक त्यांनी दिलं.
गोपीनाथ मुंडे साहेबांनी येथील गावच्या मंदिरात नवस केल्याची गोष्ट मला सांगितली होती. तो नवस पूर्ण झाला. आता मी काय नवस करु? असा प्रश्न पंकजा यांनी विचारला. त्यावर ‘मुख्यमंत्री होऊ दे’, असा नवस करा, अशी मागणी गर्दीतून झाली. त्यावर राज्यात महायुतीचं सरकार येऊ दे, असा नवस करते, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.