छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात येणा-या आणि जाणा-या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. यात राज्यात अनेक ठिकाणी निनावी रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निल्लोड येथे निवडणूक आयोगाच्या पथकाने एका वाहनातून तब्बल १९ कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने ताब्यात घेतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दागिने जळगाव येथील एका सोने व्यापा-याचे आहेत. त्याबाबत संबंधित व्यापा-याला व्यवहाराचे तपशील घेऊन बोलावण्यात आले आहे. त्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी माहिती संबंधित अधिका-यांनी दिली आहे.
निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात येणा-या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे. जिल्ह्यात या अगोदर चाळीस लाखांची रोकड तपासणीत आढळून आली होती. त्यानंतर आता शहरातील जळगावकडे जाणा-या एका गाडीमध्ये १९ कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले आहेत. ही कारवाई गुरुवारी (१४ नोव्हेंबर) सायंकाळी निल्लोड येथे करण्यात आली. विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात सात ठिकाणी वाहन तपासणीसाठी स्थिर पथकांची स्थापना करण्यात आली आहे. संभाजीनगरकडून जळगावकडे जाणा-या वाहनाची तपासणी केली असता त्यांना यात १९ कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले.
दागिन्यांची कागदपत्रं तपासणार
जप्त केलेले दागिने जळगाव येथील एका नामांकित सराफा व्यावसायिकाचे असल्याची माहिती सहायक गटविकास अधिकारी अहिरे यांनी दिली. पथकाने दागिने जप्त करून ते जीएसटी पथकाच्या स्वाधीन केले आहेत. दागिन्यांच्या व्यवहाराचा तपशील तपासला जाणार आहे. अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.