23.6 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रजनतेचा आग्रह असेल तर घराणेशाही आडवी येत नाही

जनतेचा आग्रह असेल तर घराणेशाही आडवी येत नाही

इचलकरंजी : प्रतिनिधी
आम्ही उमेदवारी देताना जनतेचा आग्रह असेल, तर देतो. तो कोणाचा मुलगा आहे म्हणून देत नाही. राहुल आवाडे यांनी जिल्हा परिषदेमध्ये चांगले काम केले आहे. त्यामुळे माझे घराणेशाहीचे भाषण येथे लागू होत नाही तरीही त्याला जोडून विरोधक अपप्रचार करतात.

त्याला बळी न पडता आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी भाजपच्या पाठीशी रहा आणि राहुल यांना निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ शहापूर येथील निर्धार सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, कर्नाटकच्या आमदार शशिकला जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

गडकरी म्हणाले, मतदान करताना जात बघू नका, काम बघा. देशाचे भविष्य बदलायचे असेल, तर चांगले लोक, नेते, चांगला पक्ष यांच्या पाठीशी रहायला पाहिजे तरच देश बदलेल. स्वत:च्या स्वार्थासाठी काँग्रेस पक्षाने घटनेची मोडतोड केली आणि घटना बदलण्याचा आरोप आमच्यावर करीत आहेत. आम्ही घटना बदलणार नाही आणि बदलूही देणार नाही.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, विरोधकांच्या हातातून निवडणूक गेल्याने ते घराणेशाही व जातीवादावर घसरत आहेत. हिंमत असेल तर विकासावर बोलावे आम्ही कोणत्याही व्यासपीठावर येण्यास तयार आहोत.

असे कुठे लिहिले आहे का?
सरकारने नागरिकांसाठी उज्ज्वला गॅस, लाडकी बहीण अशा विविध ६७ योजना आणल्या. त्यातून सर्व जाती-धर्मांतील लोकांना न्याय दिला. हा लाभ देत असताना दलित आणि मुस्लिमांनी अर्ज करता कामा नये, असे कुठे लिहिले आहे का, असा सवाल गडकरी यांनी केला.

चार राज्यांत पेट्रोलला पर्याय देणार
सर्वच वाहन कंपन्यांच्या इथेनॉलवर चालणा-या गाड्या चार महिन्यांत बाजारात येणार आहेत. सुरुवातीला महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांत इथेनॉलचे पंप उभारून पेट्रोलला पर्याय देणार आहे. त्याचा फायदा शेतक-यांना होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR