नवी दिल्ली : गुरूवारपासून दि. ३० नोव्हेंबर रोजी युएईमधील दुबई शहरात सीओपी २८ शिखर परिषद सुरू झाली असून या २८ व्या हवामान बदल शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत. ते उद्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यांसर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएई दौ-याबद्दल माहिती देताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी माध्यमांना सांगितले.
याविषयी माहिती देताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या दोन दिवसीय दुबईच्या दौ-यावर आहेत. दरम्यान ते संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन अंतर्गत आयोजित यूएन क्लायमेट चेंज कॉन्फरन्समधील पक्षांच्या २८ व्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तसेच ते इतरही तीन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ज्यापैकी दोन कार्यक्रम भारताकडून सहआयोजित करण्यात आले आहेत. भारत आणि यूएई ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह लाँच करत आहे असेही परराष्ट्र सचिवांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या कॉप परिषदेत हवामान संदर्भातील अनेक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत चालणा-या या संवादामध्ये हवामान बदलाचे दुष्परिणाम, जीवाश्म इंधनाचा वापर, मिथेन आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आर्थिक मदत आणि देण्यात येणारी भरपाई या मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे.
२०० देशांचे नेते होणार सहभागी
जीवघेणी उष्णता, दुष्काळ, जंगलातील आग, वादळ आणि पूर यांचा जगभरातील जीवनमान आणि जीवनावर परिणाम होत आहे. या मुद्यांवर संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषदेत चर्चा होणार आहे. २०२१-२२ मध्ये जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्यातील ९० टक्के जीवाश्म इंधनामुळे झाले होते.