बिझनौर : उत्तर प्रदेशसाठी शनिवारचा दिवस घातवार ठरला आहे. मध्यरात्री झाशीमध्ये रुग्णालयात होरपळून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर सकाळी बिझनौरमध्ये अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवी म्हणजे, या अपघातामध्ये नवविवाहित दाम्पत्याचा समावेश आहे. लग्न करून निघालेल्या नवरा-नवरीला मृत्यूने गाठले.
उत्तर प्रदेशमधील बिझनौरमध्ये हरिद्वार-काशीपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. हुंडई क्रेटा कारने एका ऑटोला जोरदार धडक दिली. पहाटेच्या धुक्यामुळे कारचालकाला अंदाज आला नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
ऑटोचालकाचे उपचारावेळी निधन झाले. मृतांमध्ये नवविवाहित पती-पत्नीचा समावेश आहे.
शनिवारी सकाळी अपघाताची माहिती मिळाली. क्रेटा कार दुस-या वाहनाला ओव्हरटेक करत असताना अचानक लेन बदलली गेली आणि भरधाव वेगात असलेल्या ऑटोला धडकली. त्यात धुके असल्यामुळे कारचालकाला अंदाज आला नाही. ऑटोमध्ये ७ लोक होते, त्यापैकी ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या सर्वांचे पोस्टमॉर्टेम करण्यात येत आहे, अशी माहिती बिजनौरच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
मृतकांमध्ये ४ पुरुष, २ महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. मृतामध्ये ६५ वर्षीय खुर्शीद, त्यांचा मुलगा विशाल (२५ वर्षे), पुत्रवधू खुशी (२२ वर्षे), पत्नी मुमताज (४५ वर्षे), मुलगी रूबी (३२ वर्षे) आणि १० वर्षीय बुशरा यांचा समावेश आहे.