कोल्हापूर : प्रतिनिधी
पक्षाचा झेंडा घरावर लावण्यास नकार आणि झेंडा का लावला, अशा कारणावरून पाचगाव (ता. करवीर) येथे शुक्रवारी दोन राजकीय गटांतील कार्यकर्त्यांत जोरदार मारामारी झाली.
मारामारीत काठी, फायटर, लोखंडी सळईचा वापर झाला असून या प्रकरणी परस्परविरोधी फिर्याद करवीर पोलिसांत दाखल झाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त वाढवला. मारामारीत सुरेश बंडोपंत पाटील (वय ३५, रा. पाचगाव) हा गंभीर जखमी असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
साहिल केरबा उगळे (२०, रा. भैरवनाथ गल्ली, पाचगाव, ता. करवीर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार संग्राम गोपाळ पाटील, शुभम गोपाळ पाटील, नारायण गाडगीळ आणि सुरेश पाटील (सर्व रा. पाचगाव, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी एक वाजण्याच्या सुमारास पाचगाव येथे शुभम पाटील, समीर जांभळे, ओंकार पोवार हे काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होते.
त्यावेळी फिर्यादी उगळे याने आपल्या घरावर कोणत्याही पक्षाचा झेंडा लावण्यास विरोध केला असता त्याच्या घरावर झेंडा लावून कार्यकर्ते निघून गेले. त्यानंतर उगळे यांनी हा झेंडा काढून ठेवला. ही माहिती कळताच संशयित गुन्हा दाखल झालेले चौघे पुन्हा झेंडा लावण्यासाठी गेले असता उगळे यांनी विरोध केला. त्यावेळी चार संशयितांनी फिर्यादीस शिवागीळ करून धक्काबुक्की करून काठीने मारहाण केली.