सोलापूर : त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात आणि घरांमध्ये दिवे लावून हिंदू बांधवांनी यावर्षीही दीपोत्सव साजरा केला. या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये स्थित त्रिपुर (दीपमाळ) प्रज्वलित केले गेले. यंदाच्या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदु राष्ट्राचा संकल्प करण्यासाठी ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’ हा उपक्रम हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देशभरात राबवून जनजागृती करण्यात आली.
सोलापूर शहरात ग्रामदैवत श्रीसिद्धरामेश्वर मंदिर, कालिका मंदिर, विठ्ठल मंदिर, चौपाड, पूर्वभाग दत्त मंदिर या ठिकाणी हा उपक्रम संपन्न झाला. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या या उपक्रमात शेकडो धर्मप्रेमींनी घरोघरी दिवे लावून सहभाग नोंदवला.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, त्या प्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. आसुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून तो भारतातील बर्याच ठिकाणी मंदिरांतून साजरा केला जातो. सध्या समाजात असलेल्या अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करून लोककल्याणकारी हिंदू राष्ट्र यावे या उदात्त हेतूने ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’ या उपक्रमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी मंदिरे, घरी आदी ठिकाणी दीप प्रज्वलित करताना ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’ याविषयीचे फलक हातात धरून लोकांचे प्रबोधन केले. काही ठिकाणी सामूहिक दीपपूजन करताना हिंदू राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली.