उत्तर गाझा : गाझामध्ये वर्षभरापासून सुरू असलेली इस्राइलची लष्करी कारवाई, हमास आणि हिजबुल्लाह या संघटनांच्या अनेक नेत्यांच्या केलेल्या हत्या आणि इराणसोबत घेतलेला पंगा यामुळे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे अनेकांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, बेंजामिन नेतन्याहू यांच्या उत्तर इस्राइलमधील निवासस्थानावर बॉम्बहल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
नेतन्याहू यांच्या निवासस्थानाच्या दिशेने दोन फ्लेयर बॉम्ब टाकण्यात आले. सुदैवाने हे बॉम्ब निवासस्थानाजवळील बगिच्यामध्ये पडले. या हल्ल्याबाबतची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिसांनी सांगितले की, हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणीही या ठिकाणी उपस्थित नव्हते. तसेच या हल्ल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. मागच्या काही महिन्यांत बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे.
दरम्यान, इस्राइलचे राष्ट्रपती इसहाक हर्जोग यांनी एक्सवरून या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. इस्राइलचे संरक्षणमंत्री इतामार बेन-गविर यांनीही या हल्ल्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधातील आगळीकीच्या कारवायांनी सर्व हद्द पार केली आहे.
आज रात्री त्यांच्या निवासस्थानावर करण्यात आलेला हल्ला हा सर्व सीमा ओलांडणारा आहे. काट्झ ने सुरक्षा आणि न्यायिक यंत्रणा आवश्यक ती पावले उचलतील. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यामध्येही बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. मात्र त्या हल्ल्यामध्येही कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नव्हते.