औसा : प्रतिनिधी
औसा विधानसभा मतदार संघाच्या उद्या होणा-या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून या निवडणुकीत तीन लाख चार हजार तीनशे सात मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी एक लाख ४३ हजार ५७१ स्त्री आणि एक लाख ६० हजार ७३२ पुरुष चार इतर मतदारांचा समावेश असून ३०९ मतदान केंद्रावर २७८ इमारतीमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
औसा मतदार संघातील १५५ मतदार केंद्रावर वेब कास्टिंगची लाईव्ह यंत्रणा करण्यात आली आहे. बूथ क्रमांक १७७ संवेदनशील घोषित केले असून १०५ क्रमांकाचे दापेगाव युवा बूथ निवडण्यात आले आहे. औसा पंचायत समिती येथील बुधवार सर्व महिला कर्मचारी राहणार असून सखी बूथ म्हणून संबोधण्यात येईल मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून ३२ झोनल अधिकारी नियुक्त केले असून ३० बस सात मिनी बस आणि २१ क्रुझर च्या माध्यमातून १३७६ कर्मचारी मतदान केंद्रावर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक केंद्रावर पोलिस बीएलओ होमगार्ड अशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्या अतिरिक्त राहणार असून आचारसंहिता निगराणी करिता पाच पथक चार भरारी पथक नेमले आहेत. निवडणूक काळात औसा मतदारसंघात आचारसंहिता अभंगाच्या ११तक्रारी आल्या असून चार गुन्हे दाखल झाले आहेत. ममदापूर तालुका निलंगा येथे पाच लाख पाच हजार सहाशे पन्नास रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. ८५ वर्षापेक्षा अधिक वयाचे वृद्ध व्यक्ती तसेच दिव्यांग अशा ५६४ पैकी ५३५ मतदारांचे गृह मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
निवडणूक काळात मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे देशहितासाठी मतदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे सहाय्यक निवडणूक अधिकारी घनश्याम अडसूळ आणि गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत संबोधित करताना ही माहिती दिली.